आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर:कोरोना रुग्ण असल्याचे सांगत लातुरात मनोरुग्णाचा पोलिस ठाण्यात गोंधळ; पोलिसांच्या अंगावर थुंकला, भीतीने पोलिस कर्मचारी सैरभैर

लातूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मनोरुग्णावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ लागू झाल्यापासून रस्त्यांवर पोलिसांचे राज्य असले तरी गुरुवारी सकाळी एका मनोरुग्णाने चक्क पोलिस ठाण्याचा ताबा घेत दहशत निर्माण केली. आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगत हा मनोरुग्ण पोलिस कर्मचाऱ्यांवर थुंकला. त्यामुळे पोलिसांनी पळ काढला. मात्र काही वेळानंतर तो मनोरुग्ण असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला पकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. लातूर शहरातील नांदेड रस्त्यावर विवेकानंद चौक पोलिस ठाणे आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना एक व्यक्ती पोलिस ठाण्यात आली. मला प्रादुर्भाव झाला आहे, असे ओरडत तो ठाण्यात आला. दर्शनी भागातच बसलेल्या ठाणे अंमलदारावर थुंकत त्याने मी सगळ्यांनाच कोरोना देतो असे म्हणत गोंधळ घातला. कोरोनाचा रुग्ण येऊन थुंकत असल्याचे ऐकून तेथे उपस्थित ठाणे अंमलदार आणि इतर कर्मचारी सैरावैरा पळत सुटले. त्याचा गैरफायदा घेत या व्यक्तीने ठाण्यातील कॉम्प्युटर, टेबलावरील काच, केबिनच्या काचांची तोडफोड केली. फायली फेकून दिल्या. काही कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर निर्जंतुकीकरण फवारणीचा प्रयत्न केला, मात्र त्याने तो फवाराही फोडून टाकला. ठाणे अंमलदाराच्या खुर्चीत बसून त्याने लॅपटॉप, संगणकाचीही तोडफोड केली. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर त्याचे बोलणे, वागणे मनोरुग्णासारखे असल्याची खात्री पटल्यानंतर काही पोलिसांनी धाडस करीत त्याला शिताफीने पकडले.

शासकीय कामात अडथळा

पोलिसांनी त्याची माहिती घेतली असता तो मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कलम १४४ लागू झाल्यापासून बाहेर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करणे, सकाळी फिरायला जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद देणे यामुळे सध्या पोलिसांचेच राज्य आहे. मात्र गुरुवारी सकाळी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात सुमारे तासभर या मनोरुग्णाने कब्जा केल्याचा प्रकार घडल्याने ठाण्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...