आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन आठवड्यांपूर्वी मोंढा नाक्यावर रिक्षाचालकाकडून एका महिलेच्या विनयभंगाची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शहरात रिक्षाचालकाने महिलेशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची घटना घडली. संबंधित महिलेने रिक्षातून बाहेर डोकावून आरडाओरडा सुरू केला. हा प्रसंग पाहून दाेन शिक्षकांनी तत्काळ आपली दुचाकी रिक्षासमाेर लावून त्याला अडवले. त्यानंतर धीर मिळालेल्या महिलेने खाली उतरून रिक्षाचालकाला भर रस्त्यात चाेप दिला. या प्रकारानंतर रिक्षाचालकाने पलायन केले. रविवारी दुपारी दिल्ली गेटजवळ घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा शहरातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दिल्ली गेट परिसरात दुपारी नेहमीप्रमाणे वर्दळ होती.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले बाळासाहेब गरुड, जयप्रकाश टाकणखार हे मित्रांच्या वडिलांचे निधन झाल्याने अंत्यविधीच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात गेले होते. परतताना ते जिल्हाधिकारी निवासस्थानाकडून दिल्ली गेट मार्गे हिमायत बागेच्या दिशेने निघाले. दिल्ली गेट ओलांडताच सलीम अली सरोवराजवळ त्यांना अचानक एका धावत्या रिक्षामधून महिलेचा आरडाओरडा एेकू आला. गरुड यांनी वळून पाहताच त्या महिलेने ‘अहो भाऊ, या रिक्षावाल्याला थांबवायला लावा,’ असे सांगितले. काहीतरी विपरीत घडत असल्याचा अंदाज गरुड यांना आला. त्यांनी तत्काळ आपली दुचाकी रिक्षासमोर नेऊन आडवी लावली. त्यामुळे चालकाला रिक्षा थांबवावीच लागली.
वाहन थांबताच महिलेने पटकन रिक्षातून बाहेर उडी मारली. दोन्ही शिक्षकांनी तिला धीर देत काय झाले विचारले. तेव्हा महिलेने घडलेला प्रसंग सांगितला. तोपर्यंत बरीच गर्दी जमली होती. जमावाने चालकाला जाब विचारताच त्याची बोबडी वळली. इतर वाहनचालक देखील जमा झाले. जमावाने रिक्षाचालकास चोप द्यायला सुरुवात केली. चिडलेल्या महिलेनेही पायातला बूट काढून त्याला झाेपडले. भेदरलेल्या चालकाने मात्र आराेप नाकारत नाकारत पळ काढला.
नाहक प्रश्न, वेग अचानक वाढवला
दिल्ली गेटच्या पुढे अचानक चालकाने रिक्षाचा वेग वाढवला. महिला घाबरली. तिने वेग कमी करण्याची विनंती केली, त्रास हाेत असल्याचेही सांगितले. पण दुर्लक्ष करत चालकाने आणखी वेग वाढवला व नाहक प्रश्न विचारत गैरवर्तन सुरू केले. त्यामुळे महिलेने बाहेर डोकावून मदतीची मागणी केली. सदर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला.
तिसरी घटना, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
1. महिलांची रस्त्यावर छेड काढण्याची ही शहरातील तिसरी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी दुचाकीस्वारांनी औरंगपुरा भागातून सूतगिरणी चौकापर्यंत एका विवाहितेचा पाठलाग केला होता. महिलेने बहिणीला कॉल केला. त्यानंतर बहिणीने टवाळखोरांना अडवून चाेप दिला हाेता.
2. मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ रिक्षाचालकाने गैरवर्तन केल्याने एका महाविद्यालयीन तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली हाेती. हा विषय राज्यभर गाजला. त्यापाठाेपाठ रविवारी तिसरी घटना घडली.
ऑटाेचालकाची ओळख पटू शकली नाही
महिला छेडछाडीच्या घटना गंभीर हाेत चालल्या आहेत. मात्र रविवारी या घटनेबाबत महिलेने पाेलिसांत तक्रार देण्याचे टाळले. ती सरळ घटनास्थळावरून निघून गेली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडे कुठलीही तक्रार दाखल नव्हती. माेठा जमाव जमला हाेता, त्यापैकी एकानेही पोलिसांना, नियंत्रण कक्षाला घटना कळवली नाही. परिणामी, घटनेची अधिकृत नोंद दाखल झाली नाही व चालकाची ओळख देखील कळू शकली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.