आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:जायकवाडीत जूनपर्यंत बसवणार अत्याधुनिक भूकंपमापक यंत्र ; आठ ठिकाणीही भूकंपमापक केंद्रे

पैठण / रमेश शेळके2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जायकवाडी धरणावरील सन २०१७ पासून बंद पडलेल्या भूकंपमापक यंत्रासह राज्यातील इतर ९ ठिकाणी अत्याधुनिक भूकंपमापक यंत्रे बसवण्यात येणार असून चार नवीन ठिकाणी भूकंपमापक यंत्रे लवकरच बसवली जाणार आहेत. जायकवाडीवरील भूकंपमापक डिजिटल केंद्र जूनपर्यंत बसवले जाणार असल्याचे अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाच्या ५ गेटच्या काही अंतरावर १५ नोव्हेंबर १९९४ रोजी भूकंपमापक यंत्र येथे आणण्यात आले. जायकवाडी कर्मचारी वसाहत (नाथनगर, उत्तर) येथील जलबिजली विश्रामगृहाच्या शेजारी हे भूकंपमापक यंत्र बसवण्यात आले होते. या यंत्राची संवेदनशीलता कमालीची असून त्याचे वायर तब्बल ८० मीटर भूगर्भात सोडण्यात आलेले आहेत. एखाद्या टाइपरायटरच्या आकाराचे हे यंत्र आहे. ज्यावर देश-विदेशातील भूकंपाची नोंद होत होती ते सन २०१७ पासून बंद पडले. २४ वर्षांपूर्वी ७ लाख ५० हजार रुपये खर्चून आणलेले हे यंत्र अमेरिकन बनावटीचे होते. “एमईक्यू ८-८०० मायक्रो अर्थक्वेक’ या कंपनीचे हे यंत्र जगभरातील भूकंपाच्या नोंदी ठेवण्याएवढे सक्षम आहे. हे यंत्र भूकंपाची पूर्वसूचना देत नाही किंवा भूकंप झाल्यावरच्या उपाययोजनेसाठीही या यंत्राचा उपयोग होत नाही. धरण परिसरातील भूकंपाच्या नोंदी मात्र या यंत्रावर अद्ययावत पद्धतीने केल्या जातात. भूकंपाची रिश्टर स्केलमधील तीव्रता व किलोमीटरमधील अंतर दाखवले जाते.

मात्र भूकंपाच्या केंद्रबिंदूची दिशा काढण्यासाठी महाराष्ट्र भरातील प्रकल्पांवर असलेल्या यंत्रांचा एकत्रित “ग्राफ’ पाहूनच निश्चिती करावी लागते. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पाच्या भूकंपमापक यंत्रावरील दररोज होणाऱ्या नोंदींचा ग्राफ रोजच्या रोज नाशिक येथील “मेरी’ या संशोधन केंद्राकडे पाठवला जातो. जायकवाडी धरण आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असल्याने येथे या यंत्राची आवश्यकता अधिक असते. लहान-मोठे जमिनीतील हादरे या यंत्रावर नोंदवले जात होते. त्यावर राज्यभरातील व इतर ठिकाणच्या भूकंपाची अचूक नोंद येथे होत होती. मात्र एक वर्षानंतरही हे यंत्र बंद असल्याने जायकवाडीच्या भूगर्भातील हालचाली कळत नसल्यामुळे भविष्यात मोठा धोका लक्षात घेता येथील नवीन भूकंपमापक नवीन डिजिटल यंत्र पुढील दोन महिन्यात बसवण्यात येणार आहे.

राज्यातील या ठिकाणी डिजिटल भूकंप केंद्र : नाशिक, कोयना, कोनलकट्टा, उजनी, नाथसागर, गोसीखुर्द, पार्डी-वर्धा, इसापूर, अक्ललवाडा या ९ ठिकाणी डिजिटल भूकंपमापक केंद्रे असणार आहेत, तर लोअर, दुधना, पुनंद, गिरणा या चार नवीन ठिकाणीदेखील आता भूकंपमापक केंद्रे बसवली जाणार आहेत.

जून महिन्यात बसवणार जायकवाडीवरील भूकंपमापक केंद्र जून महिन्यात डिजिटल बसवले जाणार आहे. त्यासाठी सर्व चाचण्या झाल्या आहेत. आता यंत्र आल्यावर पूर्वी ज्या ठिकाणी यंत्र होते त्याच ठिकाणी डिजिटल यंत्र बसवण्यात येणार आहे. -विजय काकडे, अभियंता, पाटबंधारे विभाग.