आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:घाटीमध्ये शस्त्रक्रिया केलेला हिंगोली तालूक्यातील रुग्ण आला कोरोना पॉझीटिव्ह, खानापूरचित्ता गाव सील करण्याच्या हालचाली

हिंगोली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील घाटीमध्ये पायावर शस्त्रक्रिया करून आलेल्या हिंगोली तालुक्यातील खानापुरचित्ता येथील रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. याबाबतचा अहवाल गुरुवारी (ता. ११) शासकिय रुग्णालयास प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता खानापूर चित्ता हे गाव सील करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. या शिवाय घाटीत शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांनीही याबाबतची माहिती दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

हिंगोली तालुक्यातील खानापूरचित्ता येथील एका ७० वर्षीय जेष्ठ नागरिकास पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याठिकाणी मागील आठवड्यात त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी ता. ८ घाटी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यानंतर बुधवारी ता. १० तो व्यक्ती पायाची ड्रेसींग करण्यासाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात गेला होता. तो व्यक्ती औरंगाबाद येथून आला असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेऊन नांदेड येथे पाठविले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी त्या व्यक्तीच्या प्रवासाची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. त्याला गावात किती जण भेटण्यासाठी आले होते त्याची माहिती घेतली जात आहे. या शिवाय घाटीमध्ये ज्या अस्थीरोग तज्ञांनी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली होती तसेच त्यांच्या सोबतच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. या शिवाय खानापुरचित्ता हे गाव सील केले जाणार असून याबाबतची कार्यवाही रात्री उशीरा सुरु केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...