आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहर्सूल अतिशीत रेत प्रयोगशाळेतील घोटाळ्याची राज्य पशुसंवर्धन प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी ११ नोव्हेंबरला सुनावणी घेऊन अफरातफर करणारा तत्कालीन कनिष्ठ लिपिक अमोल गायकवाडला तडकाफडकी निलंबित केले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची पंधरा दिवसांत फेरचौकशी करण्याचे आदेश २८ नोव्हेंबरला दिले. त्यानुसार पशुसंवर्धन आयुक्तालयातील लेखा परीक्षा विभागाने चौकशी सुरू केली आहे. आता या घोटाळ्यात मोठे भ्रष्ट अधिकारी अडकण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.
हर्सूल परिसरातील अतिशीत रेत प्रयोगशाळेत २०१७ ते २०२१ या काळात मोठा आर्थिक घोटाळा झाला. तत्कालीन विभागीय व्यवस्थापक डॉ. शशांक कांबळे व लिपिक अमोल गायकवाड यांच्याविरुद्ध कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातील उपायुक्त डॉ. एस. एस. गोरे व इतर अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. प्रधान सचिव गुप्ता यांनी यावर ११ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे म्हणणे एेकून घेतले.
पर्यवेक्षणात हलगर्जीपणा केल्याचा ठेवला ठपका प्राथमिक चौकशी अहवालाचे अवलोकन केले असता प्रामुख्याने लिपिक गायकवाडने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेल्या भविष्य निर्वाह निधीचे सुमारे ३.८८ लाख रुपये व टीडीएसचे २ लाख रुपये असे एकूण ५.८८ लाख रुपये भरणा न करता परस्पर खर्च केले. महसुली जमेचे ८.८७ लाख रुपये शासन खात्यात जमा केले नाहीत. रोकड नोंदवहीत नोंदही केली नाही. ही चूक झाल्याची लेखी कबुली अमोलने दिली. सर्व रक्कम भरण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्याची विनंती त्याने केली. यामध्ये डॉ. कांबळे यांनी पर्यवेक्षणात हलगर्जीपणा केल्याचे दिसून आल्याचा ठपका ठेवला आहे. गुप्ता यांनी अमोल गायकवाडला त्वरित निलंबित केले आणि वित्तीय अनियमिततेची सखोल चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चौकशी सुरू झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.