आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर (६ डिसेंबर १९५६) त्यांच्या अंत्ययात्रेत अनेक घोषणा दिल्या गेल्या. त्यापैकी ‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा..!’ हीदेखील घोषणा होती. याला आता ६७ वर्षे पूर्ण झाल्यावर अंशत: मूर्त रूप आले आहे. मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी अवकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. बाबासाहेबांच्या १३२ व्या जयंतीदिनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ताऱ्याचे लाँचिंग होईल. अँड्रॉइड व अॅपल युजर्स हा तारा अॅप डाऊनलोड करून पाहू शकतात.
अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी ‘इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ नावाची एक संस्था अमेरिकेत आहे. या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावे दिली जातात. फ्रान्समध्येही अशीच एक संस्था आहे. शंभर डॉलर म्हणजेच भारतीय चलनात नऊ हजार रुपये शुल्क भरून एक ताऱ्याची रजिस्ट्री केली जाते. त्या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद व्हावी म्हणून ९ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्ज केला होता. महिनाभराने शिंदे यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. https://space-registry.org या स्पेस रजिस्ट्री अॅपच्या संकेतस्थळावरून हा तारा मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे. त्याशिवाय अँड्रॉइड, किंबहुना आयफोनवरूनही आपण हा तारा पाहू शकतो.
कुणाचीही नावे देता येत नाहीत कुणीही ‘स्टार नेमिंग’ संस्थेशी संपर्क करून आमच्या नातेवाइकांचे नाव ताऱ्याला द्या, असे अजिबात चालत नसते. त्यासाठी विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते. नाव दिले जाणाऱ्या व्यक्तीचे खूप व्यापक काम असावे लागते. आम्ही दीड महिन्यापासून प्रक्रिया करत होतो. त्याला आता कुठे यश आले आहे. - राजू शिंदे, अध्यक्ष, सर्वपक्षीय आंबेडकर जयंती महासमिती
असा पाहता येईल तारा द इनाेव्होटिव्ह युनिव्हर्स स्टार फाइंडर थ्रीडी स्मार्टफोन अॅप फॉर अँड्रॉइड अँड आयओेएसवरूनही हा तारा पाहता येणार आहे. त्याशिवाय प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग नावाने अॅप डाऊनलोड करून घेता येईल. अॅपमध्ये गेल्यावर रजिस्ट्रीचा CX26529US हा क्रमांक टाकल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव दिसू शकेल. विकिपीडियावरील माहितीनुसार उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या अंदाजे १० हजार ताऱ्यांपैकी आत्तापर्यंत फक्त ३३६ ताऱ्यांची रजिस्ट्री करून विविध शास्त्रज्ञ, राजकारणी, कलावंतांची नावे दिलेली आहेत. त्यात आता बाबासाहेबांची भर पडणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.