आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार यांची घोषणा:जालन्यात जानेवारीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संशोधन केंद्र सुरू होणार, 120 एकरांत उभारणी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यातील (ता. अंबड) महाकाल येथील १२० एकर परिसरात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे एक उपकेंद्र उभारले जात आहे. नागपुरातही नितीन गडकरींनी दोनशे एकर जमीन दिली आहे. या दोन्ही विभागांत कमी पाण्यात उसाचे उत्पादन कसे घ्यायचे, यावर संशोधन करणारे केंद्र निर्माण केले जात आहे, अशी घोषणा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी (१९ नोव्हेंबर) केली. महाकाल केंद्राचे तर बांधकाम अंतिम टप्यात आहे. जानेवारीत या वास्तूचे लोकार्पणही केले जाणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित ६२ व्या दीक्षांत सोहळ्यात शरद पवार, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट. ही मानद पदवी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘पूर्वी शेती फक्त ज्वारी आणि बाजरीची केली जात होती. आता मात्र फळबागांसह कॅशक्रॉप घेण्याचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे. मराठवाड्यात उसाची विक्रमी लागवड केली जात आहे. त्यामुळे येथे उसाच्या विविध प्रजातींवर आणि कमी पाण्यात जास्तीत जास्त ऊस निर्माण करण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. महाकाल येथे १२० एकर जमीन इन्स्टिट्यूटने विकत घेतली आहे. तिथे संशोधन केंद्र तयार केले जाणार आहे. नागपुरातही गडकरी यांनी २०० एकर जमीन दिली आहे.

तेथेही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संशोधन केंद्र निर्माण केले जाणार असल्याचे पवारांनी म्हटले. मंचावर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, प्रभारी कुलसचिव डॉ. भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. चेतना सोनकांबळे, व्यवस्थापन परिषदेचे पदसिद्ध सदस्य तथा सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा, प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रदीपकुमार जाधव यांची उपस्थिती होती.

अन्नदाता शेतकरी आता ऊर्जादाता झाला पाहिजे गडकरी म्हणाले, ‘मराठवाड्यात औद्योगिक क्षेत्र आहे. जालन्यात ड्रायपोर्टच्या निमित्ताने समुद्र आणला आहे. मराठवाड्यातील कृषिमाल आता जगाच्या पाठीवर कुठेही पाठवणे शक्य आहे. शेतकरी अन्नदाता तर आहेच, त्यासोबत तो आता ऊर्जादाताही झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी सौरऊर्जेचे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. ते यशस्वी होतीलच. येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून तो आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे. विद्यापीठानेही या अनुषंगाने काही नवे अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. विद्यापीठ आता नॉलेज पॉवर सेंटर आहेत. विद्यापीठाने गरज ओळखून संशोधन करण्यावर भर द्यावा. डी.लिट. ही टर्मिनल डिग्री असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाकडून ही पदवी मला मिळाली हा बहुमान आहे.

औरंगाबादेतील विद्यापीठाची मूळ कल्पना बाबासाहेबांची पवार म्हणाले, मिलिंद कॉलेजची स्थापना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यातील विकासाचा पाया रचला. त्यांनीच येथे विद्यापीठ व्हावे अशी कल्पना मांडली होती. त्याला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी प्रत्यक्षात आणले. पुढे आपल्या कार्यकाळात विद्यापीठाचा नामविस्तार केला आणि मराठवाड्याला नांदेड येथे स्वारातीच्या रूपाने आणखी एक विद्यापीठही दिले.

बातम्या आणखी आहेत...