आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार चषक क्रिकेट स्पर्धा:अल आरजी वॉरियर्सचा शानदार विजय, बाबा बिल्डर्सला हरवले

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुवा फाउंडेशनतर्फे आयोजित आयजे क्रीडा महोत्सवांतर्गत खासदार चषक क्रिकेट स्पर्धेत अल आरजी वॉरियर्सने शनिवारी विजय मिळवला. आमखास मैदानावर झालेल्या सामन्यात वॉरियर्सने बाबा बिल्डर्स संघाला ५ गडी राखून पराभूत केले. या सामन्यात इम्रान खान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून वॉरियर्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बाबा संघाने १५ षटकांत ३ बाद ११९ धावा काढल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फारुख कुरेशी ६ धावांवर परतला. दुसरा सलामीवीर तथा कर्णधार सलमान अहमदने ४० चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचत सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. तो संघासाठी एकाकी लढला. कय्युम भोपळाही फोडू शकला नाही. अष्टपैलू रिजवान कुरेशीने १३ चेंडंूत २ चौकारांसह १३ धावा केल्या. युवा फलंदाज विनायक भोईरने २८ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने नाबाद २७ धावा करत संघाला शंभरी गाठून दिली. वॉरियर्सकडून सईद अरीफ, वहाब, वसीम शेखने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

इम्रान, अमन चमकले : प्रत्युत्तरात अल आरजीने १२.५ षटकांत ५ गडी गमावत विजय गाठले. डावाच्या पहिल्याच चेंडूंत आसिफ खान, वसीम शेख शून्यावर बाद झाले. कर्णधार इम्रानने डाव सावरला. ११ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचत २९ धावा काढल्या. परवेज खानने १९ चेंडूंत १८ धावा केल्या. अमनने २० चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने २८ धावांचे याेगदान दिले. इम्रानने १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचत नाबाद ३४ धावांची विजयी खेळी केली. बाबाकडून विनायक भोईरने १९ धावा देत ३ गडी बाद केले. शेख अल्ताफ व सलमान अमदने प्रत्येकी एकाला टिपले.

एम्पायर स्टेटची आयकॉनवर मात
दुसऱ्या सामन्यात एम्पायर स्टेट संघाने आयकॉन स्ट्रायकर्सला ४ गड्यांनी पराभूत केले. प्रथम खेळताना आयकॉनने १५ षटकांत ९ बाद १०४ धावा उभारल्या. अष्टपैलू ऋषिकेश पवारने १३ धावा देत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एम्पायर स्टेटने १४.२ षटकांत ६ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात ऋषिकेश पवारने २९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकार खेचत ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. ऋषिकेश पवार सामनावीर ठरला.

बातम्या आणखी आहेत...