आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या महिनाभरात महिलांसंबंधी गैरप्रकाराच्या अनेक घटना समोर आल्या. आता विकृतीचा कळस गाठणारा आणखी एक गंभीर प्रकार समाेर आला आहे. शाळेतील तीन लहान मुलींसोबत एका रिक्षाचालकाने दुसऱ्याच्या व्हॅनमध्ये प्रवेश करून अश्लील संवाद साधत विकृत चाळे केले. सोमवारी सिडको परिसरातील एका नामांकित शाळेत हा संतापजनक प्रकार घडला. या घटनेमुळे घाबरलेल्या दाेन मुली तापाने फणफणल्या. नऊ वर्षांच्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर तिघींच्या पालकांनी दाेन विकृतांना रंगेहाथ पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. विकास विठ्ठल बनकर (४३, रा. आंबेडकरनगर) आणि राजू मोहन रुपेकर (४८, रा. पिसादेवी परिसर) अशी त्यांची नावे आहेत.
आठ वर्षांची राखी, कल्पना व नऊ वर्षांची करुणा (नावे बदलली आहेत) या तिघी मैत्रिणी एकाच परिसरात राहतात. पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या पालकांनी शाळेत सोडण्यासाठी आराेपी राजूच्या व्हॅनची निवड केली होती. त्याच शाळेत त्याचा १२ वर्षांचा मुलगा शिकताे. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या आराेपी विकासची राजूसाेबत ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून विकृत विकासची या तीन मुलींवर नजर पडली. शाळा सुटल्यानंतर विकास हा राजूच्या व्हॅनमध्ये बसू लागला. विकासचा मुलगा शाळेत गेल्यानंतर राजू त्याला इशारा करून व्हॅनपासून लांब जायचा. त्यानंतर विकास थेट व्हॅनमधील मुलींजवळ बसू लागला.
७ डिसेंबर रोजी विकासने या मुलींसाेबत विकृत चाळे केले. मुलींनी ‘राजू काका, आपल्या व्हॅनमध्ये कुणीतरी घाणेरडा माणूस येऊन बसताेय,’ असे राजूला विश्वासाने सांगितले. मात्र, राजूचाच या कृत्यात सहभाग आहे. हे त्या चिमुकलींना माहीत नव्हते. पुढील तीन दिवस विकासने तिघींसोबत आणखी घाणेरडे कृत्य केले.तुम्ही कुणाला सांगितल्यास, तुम्ही शाळेजवळ मांस खाता, सिगारेटची थोटके उचलून पिण्याचे नाटक करता, शाळेच्या मागच्या नाल्यात जाता, असे तुमच्या घरी सांगेन, असे धमकावले.
22 गंभीर गुन्ह्यांत रिक्षाचालकच
नोव्हेंबर महिन्यात चालकाच्या अश्लील कृत्यामुळे चालत्या रिक्षातून एका १७ वर्षीय मुलीने उडी मारली हाेती. दोन वर्षांपूर्वी पैठण रोडवरील गतिमंद मुलांच्या शाळेत व्हॅनचालकाने मुलीसोबत गैरकृत्य केले होते. २०२२ च्या अकरा महिन्यांमध्ये शहरात तब्बल २३ गंभीर गुन्ह्यांमध्ये रिक्षाचालकच आराेपी असल्याचा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठीने’ यापूर्वी उघडकीस आणला हाेता. त्यामुळे रिक्षा व्यवसायात विकृत व गुन्हेगार चालकांचे वाढते प्रमाण चिंतेची बाब बनत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मुलीच्या आईने घेतले विश्वासात
शनिवारी घरी गेल्यानंतर दोघी अक्षरश: तापाने फणफणल्या. करुणाने शाळेत जाण्यास नकार दिला. तिच्या आईने विश्वासात घेतल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आईने तत्काळ राखी व कल्पनाच्या आईला संपर्क साधला. त्या तिघीही एकत्र आल्या.
पोक्सोअंतर्गत केला गुन्हा दाखल
पालकांनी त्या दोघांना रंगेहाथ पकडण्याचे ठरवले. सोमवारी दुपारी शाळा सुटताच विकास पुन्हा व्हॅनजवळ गेला. मुलींनी लांब उभ्या पालकांना खुणावले. त्यांनी धाव घेत त्याला चोप दिला. पळून जाण्याच्या तयारीत असलेला राजू हाती लागल्याने जमावाने त्याला बदडले. सिडकोचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांना शाळेत पाठवले. त्यांनी जमावाच्या तावडीतून सुटका करत आराेपींना ठाण्यात नेले. वायदंडे यांनी तत्काळ दोघांवर विनयभंग व बाललैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. तिन्ही मुलींचा जबाब नोंदवला.
चालक, वाहकांचे चारित्र्य तपासा
शाळेच्या आतील परिसरासह बाहेरसुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांची आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या प्रत्येक वाहनचालक, वाहकाची विस्तृत माहिती शाळांकडे असली पाहिजे. चालक, वाहकांचे चारित्र्य तपासण्याच्या सूचना यापूर्वीही केल्या आहेत. परंतु शाळा जबाबदारी झटकतात. शाळांसह पालकांनीही वाहनचालकाची माहिती, पार्श्वभूमी समजून घ्यावी. पाल्यांसोबत त्यांच्या वागणुकीविषयी, तो मुलांसोबत कसा वागतो, काय बोलतो हे वारंवार विचारले पाहिजे. आम्ही आता स्थानिक पोलिसांना शाळा भरताना, सुटताना गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी सांगितले.
आराेपीची पत्नी डबा घेऊन ठाण्यात, न्यायालयीन प्रक्रियेसाठी धावपळ
राजूची पत्नी मंगळवारी सकाळी डबा घेऊन ठाण्यात आली. ती न्यायालयीन प्रक्रियेसाठी धावपळ करत होती. राजूला दोन मुली असून एका मुलीचे निधन झाले आहे. तर विकासची पत्नी दोन वर्षांपूर्वी मोठ्या मुलाला घेऊन त्याला सोडून गेली. बारा वर्षांचा मुलगा विकासकडे राहतो. वडिलांच्या कृत्याचा राग त्याच शाळेत शिकणाऱ्या त्या निष्पाप मुलावर निघू नये म्हणून पोलिसांनी त्याला दिवसभर सोबत ठेवले. त्याला समजावून सांगत सायंकाळी घरी सोडले. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.