आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:वाळूच्या ट्रॅक्टरने सेवानिवृत्त पादचारी शिक्षकाला चिरडले

पाचोड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध वाळू उपसा करणाऱ्या एका ट्रॅक्टरने रात्रभर शेतात पिकांना पाणी भरून घराकडे रस्त्याने पायी येणाऱ्या सत्तरवर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाला पाचोड-झोडेगाव रस्त्यावर धडक देऊन चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी ५ च्या दरम्यान घडली. उपचारादरम्यान ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला असून भीमराव नानाजी लंके असे त्यांचे नाव आहे.

पाचोड येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक भीमराव नानाजी लंके (७०) हे पाचोड-झोडेगाव शिवारातील शेतजमीन सेवानिवृत्त झाल्यापासून स्वतः कसून परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. सध्या कृषी पंपाला रात्रीचा विद्युत पुरवठा महावितरणकडून चालू असल्याने ते पिकांना सोमवारी (२१ मार्च) रात्री पाणी भरण्यासाठी गेले होते. रात्रभर पाणी भरल्यानंतर मंगळवारी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान ते पायी घराकडे निघाले असता याच शिवारात गल्हाटी नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांना पाठीमागून धडक देत चिरडले. त्यांच्या पायाचे तीन तुकडे झाले तर छातीत गंभीर जबर मार लागला. घटना घडताच शिक्षक लंके यांनी नातवंडांना फोन करून मला ट्रॅक्टरने उडवले असल्याचे सांगितले. घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईक व ग्रामस्थांना कळतच अपघातस्थळी धाव घेतली. मात्र, अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टरचालक पसार झाला. छातीत गंभीर जखम झाल्याने प्रकृती बिघडल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...