आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीटलाइन’साठी निधी उपलब्ध करून द्या:आ.सतीश चव्हाण यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रेल्वे बोर्डाने मे 2022 मध्ये औरंगाबादमध्ये सोळा बोगींच्या ‘पीटलाइन’ला मंजूरी दिली. यासाठी 29 कोटी 94 लाख रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप निधी न मिळाल्याने प्रत्यक्षात औरंगाबाद येथील ‘पीटलाइन’चे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे औरंगाबाद येथे त्वरित ‘पीटलाइन’ सुरू करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रविवार (4 सेप्टेंबर) रोज़ी आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

औरंगाबाद येथे रेल्वेची ‘पीटलाइन’ व्हावी यासाठी आ.सतीश चव्हाण सातत्याने पाठपूरावा करत आहेत. 29 मार्च 2022 रोजी यासंदर्भात त्यांनी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन औरंगाबाद येथे त्वरित ‘पीटलाइन’ सुरू करावी अशी मागणी केली होती. त्यांनी देखील या मागणीचा सकारात्मक विचार करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वस्त केले होते. त्यानुसार रेल्वे बोर्डाने मे 2022 मध्ये औरंगाबादमध्ये सोळा बोगींच्या ‘पीटलाइन’ला मंजूरी दिली. यासाठी 29 कोटी 94 लाख रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप निधी न मिळाल्याने प्रत्यक्षात औरंगाबाद येथील ‘पीटलाइन’चे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे औरंगाबादसाठी मंजुर झालेली ‘पीटलाइन’ कागदावरच असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिले आहे. तर जालना येथे जानेवारी 2022 मध्ये ‘पीटलाइन’ करण्याची घोषणा झाली. दीडच महिन्यात यासाठी 116 कोटींचा निधी मिळून निविदाही अंतिम झाली. तसेच प्रत्यक्षात कामही सुरू झाले. ही बाब अभिनंदनीय आहे.

मात्र औरंगाबाद शहर लोकसंख्या, औद्योगिकरण, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे जालना येथे ‘पीटलाइन’ सुरू करण्यासंदर्भात आपण जी तत्परता दाखवली तीच तत्परता औरंगाबाद येथील ‘पीटलाइन’ सुरू करण्याबाबत दाखवावी अशी अपेक्षा औरंगाबादकरांच्यावतीने व्यक्त करण्यात येत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद येथे देखील त्वरित ‘पीटलाइन’ सुरू झाल्यास मराठवाड्यासाठी ते फायद्याचेच ठरेल. त्यामुळे या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून औरंगाबाद येथे त्वरित ‘पीटलाइन’ सुरू करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...