आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बायोडिझेलची विक्री करणाऱ्या दोन ट्रकसह एक स्कार्पिओ जप्त, आखाडा बाळापूर पोलिसांची मोठी कारवाई

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • परवाना नसतांनाही केली जात होती विक्री

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे बायोडिझेल विक्री करणाऱ्या दोन ट्रकसह 5.77 लाख रुपयांचा ऐवज आखाडा बाळापूर पोलिसांनी सोमवारी ता.30 ताब्यात घेतला आहे. याप्रकरणात पोलिस व महसुल विभागाने संयुक्तपणे चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शिवारात वाहनांसाठी बायोडिझेलची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या पथकाने आज दुपारी भाटेगाव शिवारात जाऊन पाहणी केली.

सदरील ठिकाणी एका ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये बायोडिझेल टाकले जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची माहिती कळमनुरी तहसील कार्यालयास दिली. त्यावरून मंडळ अधिकारी आर. व्ही. सावंत, तलाठी रामेश्‍वर गिरी, संतोष शेवाळकर यांच्या पथकाने भाटेगाव येथे जाऊन सर्व बाबींची चौकशी केली. त्यानंतर महसुल विभागाने दोन्ही ट्रक व त्या ठिकाणी असलेले 5.77 लाख रुपये, एका स्कार्पिओ जीप व सुमारे तीन हजार लिटर बायोडिझेल आखाडा बाळापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

दरम्यान, सदर बायोडिझेल विक्री करण्यासाठी लागणारा परवाना होता काय यासह सर्व बाबींची चौकशी महसुल विभागासोबतच पोलिस विभागानेही सुरु केली आहे. या चौकशीमधे विनापरवानगी बायोडिझेलची विक्री होत असल्यास पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. तर सदर बायोडिझेल गुजरात येथून आणण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

परवाना नसतांनाही केली जात होती विक्री
बायोडिझेलची या ठिकाणी विक्री करण्याचा कुठल्याही प्रकारचा परवाना संबंधितांकडे नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या संदर्भात तहसील कार्यालयाच्या पथकाने सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर आता संयुक्त चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...