आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:सेनगाव तालुक्यातील वाघजळी येथे विज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे शेतात हळद झाकण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर विज कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. १० सायंकाळी पाच वाजता घडली आहे. लक्ष्मण नारायण तांबिले (४५) असे या शेतकऱ्याचे नांव असल्याचे सेनगाव तहसील कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्हयात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास हिंगोली शहर व परिसरात हलका पाऊस झाला. तसेच सेनगाव तालुक्यातही काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतात काढून ठेवलेले हळदीच्या पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी लक्ष्मण नारायण तांबिले (४५) हे शेतात हळदीचे पिक झाकण्यासाठी गेले. या पिकावर ताडपत्री टाकत असतांना त्यांच्या अंगावर विज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेतात विज पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील शेतकरी घटनास्थळाकडे धावले. त्या ठिकाणी तांबिले गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.

दरम्यान, त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रिसोड येथील शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आला असून उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर शासनाच्या नियमानुसार मदत दिली जाणार असल्याचे तहसीलदार जिवककुमार कांबळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...