आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवार जप्त:वाढदिवसानिमित्त तलवारीने सात केक कापणाऱ्या तरुणाला अटक

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवसानिमित्त फटाक्यांची आतषबाजी, डोक्यावर फेटा, गळ्यात मोठा हार अन् खांद्यावर शाल, पांढरा शर्ट व काळी पँट परिधान करून तरुणाने धारदार तलवारीने सात केक कापले. मात्र, वाढदिवसाचा उत्साह संपताच रात्रीतून त्याला पोलिस कोठडीची वारी करण्याची वेळ आली. सिटी चौक पोलिसांनी सोमवारी वाढदिवसाचा केक तलवारीने कापून तो सोशल मीडियावर टाकणाऱ्या निखिल आनंद सरवैये (२५) यास अटक करत ३६ इंच लांबीची धारदार तलवार जप्त केली आहे.

शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी शहरात १०० तलवारी ऑनलाइन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे शहर पोलिस व विशेषत: सायबर पोलिस सतर्क झाले आहेत. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टसह दहशत निर्माण करणाऱ्यांवर विशेष लक्ष आहे. त्यातच २० जून रोजी सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांना एक तरुण तलवारीने केक कापून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, मुक्तेश्वर लाड यांना कारवाईचे आदेश दिले.

गांगुर्डे, लाड यांनी अंमलदार मुनीर पटाण, शाहीद पटेल, ओमप्रकाश बनकर देशराज मोरे, सोहेल पठाण, अभिजित गायकवाड यांच्या मदतीने शोध घेतला असता जाधवमंडीतील बांबू गल्लीतील तरुण असल्याचे समोर आले. त्यांनी निखिलला ताब्यात घेतले. त्याने काही महिन्यांपूर्वी तलवार विकत घेतली होती. निखिलच्या कुटुंबाचा परिसरात किराणा व्यवसाय आहे. पोलिसांनी ३६ इंच लांबीची धारदार तलवार जप्त करत त्याला न्यायालयात हजर केले. ही कारवाई निरीक्षक अशोक गिरी, अशोक भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

बातम्या आणखी आहेत...