आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या संकटामुळे जगभरात एकीकडे उद्योग ठप्प आहेत, रोजगाराचा प्रश्न आहे, अशा परिस्थितीत औरंगाबादच्या एका तरुणीने लॉकडाऊनमध्ये नवीन कंपनी सुरू करण्याचे धाडस केले. ऑनलाइन इंटरव्ह्यू घेत ९ जणांना कंपनीत काम दिले. विशेष म्हणजे कंपनी स्थापनेपासून एकही दिवस कर्मचारी कार्यालयात आलेले नाहीत. वर्क फ्रॉम होमद्वारे ते असाइनमेंट पूर्ण करत आहेत. महिनाभरात कंपनीला ८-१० क्लायंट्सही मिळाले हे विशेष.
औरंगाबादेत समर्थनगरमध्ये राहणाऱ्या ऋतुजा मयूर रत्नपारखी यांनी संगणकशास्त्रात एमएस्सी केले आहे. त्यांचे पती व्यावसायिक असून पत्नीने शिक्षणाचा उपयोग करत एखाद्या व्यवसायात उतरावे, असे त्यांना वाटे. यासाठी त्यांनी स्टरबॅच टेक्नॉलॉजीज प्रा.लि. या कंपनीची स्थापना केली. लॉकडाऊनच्या काळात नोंदणीसाठी उद्योग खात्याकडे ऑनलाइन अर्ज केला. चौथ्या दिवशी मंजुरी मिळाली. लोकल टू ग्लोेबल हे घोषवाक्य असणारी ही कंपनी डिझायनिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सोशल मीडिया मार्केटिंग, अॅप तयार करणे आदी क्षेत्रांत काम करते. आयटीमधील हे काम असल्याने प्रत्यक्ष क्लायंट समोर असण्याची किंवा कार्यालयात येण्याची गरज नव्हतीच.
ग्राहकांना पाठवले जाते ऑनलाइन कोटेशन
कंपनीसाठी कुशल कर्मचाऱ्यांची गरज पाहता लॉकडाऊन असल्याने ऋतुजा यांनी सोशल मीडियावर यासंबंधी जाहिरात पोस्ट केली. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन इंटरव्ह्यू झाले. यातून ९ जणांची निवड करण्यात आली. आता घरूनच क्लायंट्सचा शोध सुरू केला. अनेकांना ऑनलाइन कोटेशन पाठवले. त्यास बऱ्यापैकी यश आले. ८-१० क्लायंट फायनल झाले. काही प्रक्रियेत आहेत.
लॉकडाऊनमध्ये संधी
वेब डिझायनिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम लॅपटॉप, संगणकावर कोठूनही करता येते. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या सध्या काम करत नाहीत. त्याचा फायदा आम्हाला होत आहे. -ऋतुजा रत्नपारखी, औरंगाबाद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.