आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम आदमी पार्टीने दिल्लीनंतर पंजाबमध्ये बहुमताने सत्ता काबीज केली, तर गोव्यात दोन जागांवर खाते उघडून राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. त्यामुळे आता सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्रात मुंबई व औरंगाबाद महापालिका निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती आपचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी दिव्य मराठीला दिली. त्यांनी १८ मार्च रोजी औरंगाबादेत आढावा घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
दिल्ली सरकारने मोफत व दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्याच्या साेयी-सुविधा, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, पर्यटन, रोजगार आदी सर्वांगीण विकास आणि भ्रष्टाचारमुक्त शासन व प्रशासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आप दुसऱ्यांदा दिल्लीत बहुमताने विजयी झाले. त्याच धर्तीवर पंजाबमध्ये प्रचार व प्रसार केला. जनतेला आमची तळमळ पटली व त्यांनी बहुमताने आमच्या हाती सत्ता दिली. गोव्यातही दोन जागांवर विजयी झालो. शाश्वत विकास हेच आमचे ध्येय आहे. मुंबई व औरंगाबादेतील मनपा निवडणूकही आता आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर लढणार आहोत. त्यासाठी औरंगाबाद शहरात येऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. येथील जनेतेचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी आपने आजवर काय केले व पुढे काय करणार आणि काय केले पाहिजे, याबाबत आढावा घेतल्याचे गौतम यांनी सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष तथा कार्याध्यक्ष रघुनाथ पाटील, सदाशिव पाटील, अनिल ढवळे, सुग्रीव मुंडे, मोहम्मद बशीर, सुनील भालेराव, शेख उस्मान, संजय नांगरे, अंकुश आगे, ऋग्वेद राईकवार, मेघा रायाकवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.