आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"आमदार वाणीसाहेब असते तर खोके घेणाऱ्यांना बुटाने मारले असते", असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे वैजापूरच्या सभेत म्हणाले. याचा समाचार घेताना अब्दुल सत्तार यांनी खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य करीत "ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटानेच मारले पाहिजे," असे प्रत्युत्तर अंबादास दानवे यांना दिले. ते अहमदनगरमधील राहुरीत बोलत होते.
राहुरीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 36 वा पदवीदान समारंभ पार पडला. या समारंभाला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांची उपस्थिती होती. तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ऑनलाईन हजर होते.
अब्दुल सत्तार यांचा हल्लाबोल
अब्दुल सत्तार म्हणाले, "ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटानेच मारले पाहिजे. त्यांना दोन बायका करण्याचा अधिकार हिंदू धर्माने दिलाय का? जर अधिकार असेल तर मारु नका, नसेल तर त्यांना जरुर मारा. विधानपरिषदेच्या शपथपत्रात त्यांनी दोन बायका असल्याचे लिहून दिले आहे"
मुख्यमंत्र्यांवर कार्यकर्त्यांचा विश्वास
अब्दुल सत्तार म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. अनेक पक्षातील लोक त्यांच्या कामावर खुश आहेत. एकनाथ शिंदे हे गतिमान सरकार चालवत आहेत. जनतेचा मुख्यमंत्री म्हणून सहज उपलब्ध असलेले अशी त्यांची ओळख आहे. त्यावर विश्वास ठेवून राज्यभरातील अनेक पक्षातील लोक आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत.
निलम गोऱ्हे सत्य बोलल्या
अब्दुल सत्तार म्हणाले, राजकीय परिवर्तनासाठी भविष्यात अनेक लोक शिंदे गटात येतील. आगामी सर्व निवडणुका भाजप-शिंदे गट जिंकणार. "जशाजशा निवडणुका जवळ येतील तसे हजारोंच्या संख्येने लोक शिंदे गटात प्रवेश करतील. नीलम गोऱ्हे जे बोलल्या ते सत्य बोलल्या आहेत.मला त्याचं राजकारण करायचं नाही. मात्र ठाकरे गटातील ज्येष्ठ नेतेच बोलत आहेत.
शिंदेंनी सामान्यांना ताकद दिली
अब्दुल सत्तार म्हणाले, शिवसेना ठाकरे गटामध्ये कार्यकर्ता, नेता नाराज आहे. काम करण्याच्या पद्धतीमुळे नाराज आहेत. शिवसेना आपली नितीमत्ता विसरलीय. ज्या पक्षाशी जीवनभर लढले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. मी काँग्रेस सोडून इकडे आलो. एकनाथ शिंदेंनी सामान्य माणसाला ताकद देण्याचे हे परिणाम आहेत.
काय म्हणाले होते अंबादास दानवे?
वैजापूरचे माजी आमदार दिवंगत आर एम वाणी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमावेळीअंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी आज असते तर शिंदे गटाच्या आमदारांना बुटाने मारले असते आणि हीच लायकी राहिली आहे आणि राहणार आहे. पूर्वी ग्रामपंचायतीला कवडी देत नव्हते. आता लाख-लाख, दोन दोन लाख देऊ लागलेत, म्हणून खोके हे खरेच आहे, खोटे थोडेच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.