आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही फायनल हरलो साहेब!:साडेतीन महिन्यांच्या मेहनतीचे अर्ध्या तासात वाटोळे झाले - कृषिमंत्री सत्तारांकडे शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

संतोष निकम | कन्नड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"साहेब माझ्या लेकरा-बाळाला सोडून मी रात्री-बेरात्री पाण्यावर यायचो. साडे तीन महिन्यांच्या मेहनतीचे अर्ध्या तासात सगळं वाटोळं झालं हो. नऊ एप्रिलला गारा झाल्या त्या रात्री आम्ही जेवलोसुद्धा नाही. आम्ही फायनलमध्ये हरलो अशी आर्त व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. या धर्तीवर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जावून पीक पाहणी केली तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या यातना त्यांच्यापुढे व्यक्त केल्या.

आम्ही हरलोय..!

कन्नड तालुक्यातील निपाणी येथील कांदा उत्पादक शेतकरी दत्तात्रय निकम यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर टाहो फोडला. त्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. ते म्हणाले की, आता फक्त कांदा कापायचे बाकी राहिले होते. कांदे काढून लोकांची देणेदारी देऊन टाकायची असे ठरलेले होते. नऊ तारखेला निसर्गाने असा काही घाला घातला की त्यात निसर्ग जिंकला आणि शेतकरी हरला साहेब...'

तालुक्यात ९ एप्रिलला अर्धातास गारपीट

तालुक्यातील जेहूर, निपाणी या भागात ९ एप्रिल रोजी अर्धा तास झालेल्या गारपिटीने जोरदार झोडपल्याने काढणीसाठी आलेल्या कांदा पिकांचे व फुलाेऱ्यात आलेल्या उन्हाळी बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने जेहूर येथील अशोक पवार, संजय पवार, निपाणी येथील दत्तात्रय निकम यांच्या थेट शेतात जाऊन कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी एकाच दिवशी एकापाठोपाठ जाऊन पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी दत्तात्रय निकम यांनी ओक्साबोक्शी रडत आपली व्यथा मांडली

वस्तूनिष्ठ पंचनामे करा - सत्तार

अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी पंचनाम्यातील अटींबाबत शेतकऱ्यांच्या भावना जाणुन घेतली. पीक हातातून गेल्यानंतर त्याच्या वेदना काय असतात याची मला जाणीव आहे. तुमचे नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्र्यांना बोलून जास्तीत जास्त पैसे कसे देता येतील यासाठी मी आलो आहे.

शेतकरी वंचित राहणार नाही

अब्दुल सत्तार म्हणाले, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. जेहूर, निपाणी या भागात गारपिटीमुळे कांदा, बाजरी, बिजवाई, मका या पिकांचे नुकसान झालेले आहे. कालपासून या ठिकाणी पंचनामे सुरू झाले आहेत. दोन दिवसांत सर्व पंचनामे होतील. पंचनामे झाल्यानंतर शासन नक्कीच शेतकऱ्यांना मदत करेल.

यावेळी गोकुळसिंग राजपुत, केशव राठोड, निपाणीचे सरपंच पंढरीनाथ कदम, जेहूरचे सरपंच बाळासाहेब खैरनार, प्रतापराव सूर्यवंशी, दत्तू निकम, उपसरपंच ज्ञानेश्वर बोरसे, रमेश निकम, संजय रिंढे, गणेश पवार, गणेश बोरसे आदींसह शेतकरी हजर होते.

निपाणी येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर कांदा पिकाच्या नुकसानीची व्यथा मांडताना शेतकरी