आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधी करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी:घाटीच्या सुपरस्पेशालिटीचे खासगीकरण रद्द करा

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये जीटीएल, समांतर, रॅम्कीच्या प्रयोगानंतर घाटीतील सुपरस्पेशालिटीचे पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलच्या रूपातून खासगीकरण केले जात असल्याचे ‘दिव्य मराठी’ने समोर आणले होते. आता महाविकास आघाडीच्या विविध निर्णयाला सरकारकडून स्थगिती दिली जात आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील औरंगाबाद, लातूरचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल पीपीपी करणे चुकीचे असून मागास भागात सरकारी गुंतवणूक येणे गरजेची असल्याची भूमिका मांडली होती. आता सरकार बदलल्यामुळे पीपीपीचा निर्णय रद्द करण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि आरोग्य क्षेत्रातून होत आहे.

औरंगाबाद आणि लातूरमध्ये सुपरस्पेशालिटीचे पीपीपी मॉडेल करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. १५० कोटींची इमारत यंत्रसामग्रीसह सुसज्ज असताना तिचे खासगीकरण करणे चुकीचे असल्याने लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतले आहेत.केंद्राने दिला निधी, राज्य करतेय खासगीकरण : घाटीत तीन वर्षांपूर्वी दोन लाख दहा हजार स्क्वेअर फूट जागेत सहा मजली इमारत उभारली आहे. त्यात ३२२ बेड व यंत्रसामग्री आहे. जानेवारी २०२१ मध्ये शासनाने चारही सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ८८८ पदे भरण्यास मंजुरी दिली होती. मात्र गेले वर्षभर काहीच हालचाल झाली नाही. औरंगाबादमध्ये २२२ पदे भरण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात दोन सुपरस्पेशालिटीची निवड
पहिल्या टप्प्यात घाटीतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील अतिविशेषोपचार रुग्णालयाची देखभाल व व्यवस्थापनाचे खासगीकरण केले जाण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत पहिल्या टप्प्यात दहा वर्षांसाठी पीपीपीच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी पीपीई मॉडेलला विरोध केला होता. मागास भागात सरकारी गुंतवणूक जास्त असली पाहिजे. पुढारलेल्या भागाला पीपीपी गुंतवणूक हवी. यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. पीपीपी मॉडेलसाठी गुंतवणूकदार मुंबई, पुणे अशा शहरात येतील. गुंतव‌णूकदारांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळेल. लातूर, औरंगाबाद या भागांत कोण गुंतवणूक करणार, असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला होता.

मराठवाड्याच्या हितासाठी स्थगिती द्या
मराठवाड्याच्या मागास भागात सरकारी गुंतवणूक वाढवण्याऐवजी आरोग्याचे खासगीकरण होत आहे. त्यामुळे पीपीपी मॉडेल रद्द करून पदभरती करून हे हॉस्पिटल सुरू करावे. त्याचा फायदा जनतेला होणे गरजेचे आहे.
- डॉ. अशोक बेलखोडे, माजी सदस्य, मराठवाडा विकास मंडळ

मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार
घाटी दवाखान्यात मराठवाड्यासह १४ जिल्ह्यांतून रुग्ण येतात. गरिबांसाठी घाटीच्या सुविधा वरदान आहेत. सुपरस्पेशालिटीचे पीपीपी मॉडेल रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.
- प्रदीप जैस्वाल, आमदार

मग सरकार काय कामाचेॽ
औरंगाबाद, लातूरच्या सुपरस्पेशालिटीचे खासगीकरण होत असेल तर सरकार काय कामाचेॽ आघाडी सरकारचा हा निर्णय रद्द करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांकडे मी तशी मागणी करणार आहे.
- इम्तियाज जलील, खासदार

बातम्या आणखी आहेत...