आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:महिला पाेलिसाशी गैरवर्तन; खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामगार उपायुक्त कार्यालयात सुनावणी सुरू असताना खासदार इम्तियाज जलील हे २४ दुकानदारांना घेऊन थेट कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या दालनात गेले. या वेळी वादावादी झाली. - Divya Marathi
कामगार उपायुक्त कार्यालयात सुनावणी सुरू असताना खासदार इम्तियाज जलील हे २४ दुकानदारांना घेऊन थेट कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या दालनात गेले. या वेळी वादावादी झाली.
  • दुकानांवरील कारवाई मागे घेण्यासाठी कामगार उपायुक्तांशी उद्धट वागल्याची तक्रार

लाॅकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांच्या सील केलेल्या दुकानांवरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी गेलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी कामगार उपायुक्तांशी अरेरावी केली. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर महिला पोलिसाशी गैरवर्तन केले. कर्तव्याचा भाग म्हणून महिला पोलिस चित्रीकरण करत असताना खासदारांनी हाताला धक्का देऊन त्यांचा माेबाइल खाली पाडला, त्यांना उद्धटपणे वागणूकही दिली. याप्रकरणी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी स्वत: क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २५ जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यासह विविध कलमांंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सील केलेल्या ६६ दुकानांबाबत मंगळवारी कामगार उपआयुक्त कार्यालयात सुनावणी होती. तेव्हा खासदार इम्तियाज हे २४ दुकानदारांना घेऊन पोळ यांच्या दालनात गेले. पोळ यांना एकेरी भाषा वापरत ‘व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याची परवानगी दे, त्यांना काय दंड करणार ते आताच सांग..’ असे सुनावले. त्यावर पोळ प्रक्रिया समजून सांगत असताना ‘तू दुकानातील कामगारांना खाण्या-पिण्यासाठी पैसे पुरवणार आहेस काय? तू कलेक्टरची हुजरी करतोस, कलेक्टर तुझा भगवान आहे काय ? मुख्यमंत्र्यांनी या कामगारांना मदत केली काय ?’ असे नाहक प्रश्न विचारत उद्धटपणे वागणूक दिली. याच दरम्यान क्रांती चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे, देवकर, महिला अंमलदार एन. टी. खान इतर कर्मचारी दाखल झाले.

खासदार इम्तियाज हे उद्धटपणे बोलत असताना महिला पोलिस अंमलदार खान यांनी कर्तव्याचा भाग म्हणून मोबाइल काढून व्हिडिओ शूटिंग सुरू केले. तेव्हा खासदारांनी त्यांच्या हाताला झटका देत माेबाइल खाली पाडला. ‘मॅडम तुम्ही इथे एंटरटेनमेंटसाठी आलात काय? जमत नसेल तर बाहेर उभे राहा,’ असे सुनावले. त्यानंतर व्यापाऱ्यांनीही मोठमोठ्याने बोलून गोंधळ घातला. त्यामुळे खासदारांसह नासेर सिद्दिकी, शेख सलीम शेख शरीफ, राजेश मेहता यांच्यासह सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारी कामात हस्तक्षेपासह अनेक कलमांन्वये गुन्हे नोंद
कलम ३५३ (सरकारी कामात हस्तक्षेप, लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून बलप्रयोगाने रोखणे), ३३२ (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे), १८८ (लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा), २६९ (जीवितास धोकादायक रोगाचा संसर्ग पसरविण्याच्या संभवाची हयगयीची कृती) आदी कलमांनुसार २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...