आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिसभा निवडणूक!:अभाविपने दिली युवकांना संधी; दोन माजी सदस्यांचाही समावेश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने विद्यापीठ पदवीधर अधिसभा निवडणुकीत 10 जणांचे अर्ज गुरुवारी दाखल केले आहे. पॅनल प्रमुख तथा मंचचे प्रदेश सचिव डॉ. गजानन सानप यांच्या नेतृत्वात डॉ. आंबेडकर पुतळा ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढली.

तसेच डॉ. सानप यांनी निवडणूक यंत्रणेवर शरसंधान साधत आमदार सतीश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. आम्ही पदवीधर कार्यकर्त्यांना संधी दिली. चव्हाण यांनी मात्र धनदांडगे उमेदवार मैदानात उतरवले तरीही आमचेच वर्चस्व असेल असेही त्यांनी म्हटले.

डॉ. सानप म्हणाले, ‘ राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत विद्यापीठातील प्राधिकरणाच्या निवडणूूका पार पाडाव्यात असे निर्देश राज्यातील सर्व प्रादेशिक विद्यापीठांना दिले होते. पण कुलगुरू तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भगवान साखळे यांनी विद्यापीठाची निवडणूक यंत्रणा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या दावणीला बांधली आहे. त्यांच्या इशाऱ्यावर निर्णय घेतले जात आहेत.

सुटीच्या दिवशी पदवीधर अधिसभा निवडणूकांचा कार्यक्रम घोषित केला जातो. आम्ही मागणी करूनही बुथनिहाय मतदारांची यादी प्रसिद्ध केली जात नाहीये. यादीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी केली गेली आहे. त्याची कुलगुरूंनी चौकशी केली पाहिजे. पण त्यांना पूर्णपणे दबावात घेतले जात आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे तक्रारही केली आहे. विद्यापीठाला आमदार चव्हाण हे राजकारणाचा अड्डा बनवू पाहत आहेत. त्यांनी धनदांडग्या उमेदवारांना मैदानात उतरवले आहे.

आम्ही मात्र शैक्षणिक आणि विद्यार्थी चळवळीत काम करणाऱ्यांना संधी दिली आहे. यंदा अभाविपचे दहा पैकी आठ उमेदवार विजयी होतील, असा दावाही डॉ. सानप यांनी केला आहे. माजी व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, भाजप प्रदेश सचिव प्रवीण घुगे, डॉ. गोविंद काळे, डॉ. कालिदास भांगे, डॉ. देवराज दराडे, डॉ. भगवानसिंग डोबाळ, डॉ. सुरेश मुंडे, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. शिवाजी हुसे, मराठवाडा शिक्षक मतदार संघातील भाजपचे उमेदवार किरण पाटील, प्राचार्य डॉ. सुहास मोराळे डॉ. राम बुधवंत, पंकज भारसाकळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

माजी अधिसभा सदस्य डॉ. योगिता तौर, ॲड. सुनील जाधव, ॲड. आशिष नावंदर, अमर कदम आदींनी खुल्या प्रवर्गातून नमांकन दाखल केले आहे. राखीव प्रवर्गातील भटक्या विमुक्तांमधून चंद्रकांत फड, अनुसूचित जमातीमधून गजानन डुकरे, इतर मागास प्रवर्गातून संतोष थोरात, अनुसूचित जातीमधून संजय गायकवाड, महिलांमधून ज्योती आसाराम तुपे आणि मोहमद आझरुदीन यांनीही अनुसूुचित जमातीतून नामांकन दाखल केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...