आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एसटी बस बंद असल्याने उत्तरपत्रिकांचा प्रवास अडचणीचा झाला आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीस विलंब होत असून तपासलेल्या उत्तरपत्रिकाही मंडळात वेळेवर जमा केल्या जात नाहीत. इतर मंडळांच्या तुलनेत औरंगाबाद मंडळाचे काम मागे आहे. त्यामुळे ज्या शाळेतील शिक्षक वेळेवर उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण करणार नाहीत, अशा शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करणार असल्याचे आदेश शिक्षण उपसंचालक, प्रभारी विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी पत्राद्वारे दिले आहेत.
इयत्ता १२ वीची परीक्षा ४ मार्च, तर १० वीची १५ मार्चपासून परीक्षा सुरू झाली होती. दहावीची नुकतीच परीक्षा संपली, तर बारावीची ७ एप्रिलला संपणार आहे. यादरम्यान झालेल्या विषयाची परीक्षा संपल्यानंतर २१ दिवसांनंतर उत्तरपत्रिकांचे परीक्षण व नियमन करून संबंधित विषयाची उत्तरपत्रिका विभागीय मंडळात जमा करणे आवश्यक असते. तसे विषयनिहाय वेळापत्रकही मंडळाने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. याबाबत ५ एप्रिल रोजी राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी ऑनलाइन सभेत आढावा घेतला असता, औरंगाबाद विभागीय मंडळ वगळता उर्वरित सर्व मंडळांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळापत्रकाप्रमाणे ९० टक्के पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, औरंगाबाद मंडळाचे उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज विचारात घेता निकाल घोषित करण्यास विलंब होणार असल्याचे दिसून येते. विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावरील शाळांतील शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीस विलंब करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित शाळा व महाविद्यालयाची मंडळ मान्यता व मंडळ संकेतांक गोठवण्याबाबत निश्चित कारवाई करण्यात येईल, असे आदेश मुख्याध्यापकांना पत्रकाद्वारे शिक्षण उपसंचालक साबळे यांनी दिले आहेत. एसटी बस बंद असल्यामुळे उत्तरपत्रिका ने-आण करण्यासाठी अडचणी येत असल्याने एक-दोन दिवस मागे पुढे होत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी पावणेदोन लाख विद्यार्थी असल्याने उत्तरपत्रिका तपासणी वेळेत होणे अपेक्षित आहे.
वेळेत निकालासाठी आदेश
नुकत्याच झालेल्या एका बैठकीत किती मंडळांच्या किती उत्तरपत्रिकांची तपासणी झाली आहे, याविषयी राज्य मंडळाकडून आढावा घेतला. यात औरंगाबाद इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याचे निदर्शनास आले. परंतु, उत्तरपत्रिका तपासणी सुरू आहे. यंदा निकाल वेळेत लावायचा आहे यासाठी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे नियमांचे सर्वांनी पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल.
- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.