आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबीय शोकाकुल:खडकाळ रस्त्यावरून कार उलटून आयटी इंजिनिअरचा जागीच मृत्यू

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामाच्या व्यापात भेट होत नसलेले पाच मित्र शुक्रवारी रात्री जेवायला बाहेर गेले होते. तेथे निवांत गप्पा, जेवण करून पहाटे तीन वाजता सर्वजण घराकडे निघाले. कार असलेला मित्र प्रत्येकाला घरी सोडत होता. शेवटच्या मित्राला सोडण्यासाठी जात असताना मात्र खराब रस्त्यावरील झाडाच्या खोडावर कार आदळली. त्यामुळे कार दोन-तीन वेळा रस्त्याच्या बाजूला उलटली. यात अक्षय एकनाथ राठोड (२९) या तरुण आयटी इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला, तर मागे असलेला रोहित गोविंद संगवई (२८) हा जखमी झाला. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मागील बाजूच्या रस्त्यावर हा अपघात झाला.

अक्षय कुटुंबासह गारखेड्यातील छत्रपतीनगरात राहत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या रोहित व अन्य तीन मित्रांनी शुक्रवारी भेटण्याचे नियोजन केले होते. या मित्रमंडळीत कुणी आयटी इंजिनिअर, तर कुणी व्यावसायिक आहेत. पण सर्वच जण आपापल्या कामात बिझी असल्याने त्यांची भेट होत नव्हती. त्यामुळे शुक्रवारी सर्वांनी जेवायला जाण्याचा बेत आखला. अक्षयच्या बालेनो कारमध्ये बसून पाचही मित्र बीड बायपासवरील एका हाॅटेलात गेले. परतण्यासाठी त्यांना शनिवारची पहाटच झाली. ३ वाजेच्या सुमारास खडकेश्वर येथील मित्राला सोडण्यासाठी अक्षय व रोहित निराला बाजारमार्गे गेले. त्याला सोडून परतत असताना मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मागील बाजूच्या बोळीतून अक्षयने कार घातली. महापालिकेकडे वळण घेत असताना अंधार व खड्डेमय रस्ता असल्याने त्याची कार झाडाच्या खोडाला धडकली. वेग अधिक असल्याने कार तीन ते चार वेळा पलटी होऊन लांब पडली. मोठा आवाज झाला. स्थानिकांनी तत्काळ धाव घेतली असता अक्षय गंभीर जखमी अवस्थेत कारच्या बाहेर येऊन पडलेला दिसला, तर मागील सीटवर असलेला रोहित मदतीसाठी याचना करत होता.

सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारी, उपनिरीक्षक कल्याण चाबुकस्वार यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडून रोहितला बाहेर काढले. त्याला व अक्षयला घाटीत दाखल केले. पण डॉक्टरांनी अक्षयला तपासून मृत घोषित केले. डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. सिटी चौक पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

कार चालवताना सीट बेल्ट लावला नसल्याची दाट शक्यता पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या ठिकाणी अर्धा रस्ता सिमेंटचा असून पुढे खराब आहे. अंधारात अक्षयला खराब रस्त्याचा अंदाज आला नाही. मोठे खड्डे व दगडावरून कार गेल्याने ती उलटली असावी. अपघातानंतर अक्षय कारच्या बाहेर फेकला गेला. त्यामुळे त्याने सीट बेल्ट लावला नसावा किंवा मागून तो खोचला असावा, असा अंदाज आहे. कारण शेजारच्या सीटवर कोणीही नसताना त्याचा सीट बेल्ट लावलेला होता व तेथील एअरबॅग बाहेरदेखील आली हाेती.

रविवारी मुलगी पाहायला जाणार होता अक्षय जयभवानी विद्या मंदिरात शालेय शिक्षण झालेला अक्षय अभ्यासात हुशार होता. त्याचे मित्र सुशिक्षित व उच्चपदस्थ नोकरी-व्यावसायिक आहेत. जेएनईसीत अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर तो पुण्याच्या आयटी कंपनीत रुजू झाला होता. सध्या तो वर्क फ्रॉम होम काम करत होता. वडील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून लहान भाऊदेखील अभियंता आहे. अक्षय उशिरापर्यंत घरी न आल्याने काळजीत असलेल्या वडिलांनी तीन वाजता फोन करून त्याच्याशी संवाद साधला होता. तेव्हा थोड्याच वेळाच घरी येतो, असे अक्षयने त्यांना सांगितले होते. मात्र दोन तासांनी त्याच्या अपघाताची बातमी वडिलांना फोनवरून कळवण्यात आली. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. अक्षयच्या लग्नासाठीही काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. रविवारी तो मुलगी पाहण्यासाठी जाणार होता, त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली.

बातम्या आणखी आहेत...