आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलाला कंपनीत सोडून दुचाकीने घरी जाणारे सुरक्षा रक्षक दीपक शेषराव कौसडीकर (५५) हे वळदगावच्या धोकादायक नळकांडी पुलावरून बुधवारी (२९ सप्टेंबर) सकाळी वाहून गेले. दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर दीड किमी अंतरावर कदम वस्ती शिवारात त्यांचा मृतदेह सापडला. मागील वर्षीही एक जण या पुलावरून वाहून गेला हाेता. २०१५ मध्ये अामदार संजय शिरसाट यांनी पुलाचे काम करू असे अाश्वासन दिले हाेते. ते अद्याप प्रत्यक्षात उतरले नाही. पंढरपूर-वळदगावला जोडणाऱ्या खाम नदीवरील नळकांडी पुलावरून पाणी ओसंडून वाहत होते.
कांचनवाडी येथील कौसडीकर हे मुलगा जयराज याला दुचाकीने वाळूजच्या कंपनीत सोडून पुन्हा त्याच रस्त्याने निघाले तेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त हाेता. त्यामुळे पूल ओलांडून न जाता दोन किमीचा वळसा घालून पाटोदामार्गे जाण्याचा सल्ला नागरिकांनी दिला. मात्र, त्यांनी दुचाकी पाण्यातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. वेगवान पाण्यामुळे ते दुचाकीसह कठडा नसणाऱ्या पुलावरून खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांनी पोहण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता.
मात्र, खडकालगतच्या भोवऱ्यात अडकून ते अचानक दिसेनासे झाले. ही माहिती कळताच पंचायत समितीचे माजी सदस्य गणेश नवले, माजी सरपंच कांतराव नवले, उपसरपंच संजय झळके यांनी काही तरुणांसाेबत शोधमोहीम सुरू केली. साधारण दीड किमी पश्चिमेच्या दिशेला कदम वस्तीलगत कौसडीकर बेशुद्धावस्थेत आढळले. डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. आतापर्यंत या पुलावरून पडून तत्कालीन उपसरपंच राजेंद्र झळके यांच्यासह ८ जणांचा बळी गेला आहे.
मदतीसाठी उडी घेणारा वाचला
कौसडीकर पाण्यात बुडत असल्याचे पाहून गुलाब माळी यांनी नदीपात्रात उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, पट्टीचे पोहणारे असूनही माळी यांना कौसडीकर यांच्या दिशेने जाता अाले नाही. ते प्रवाहात वाहत गेले. सुदैवाने पुढे एका झाडाची फांदी हाती लागल्याने त्यांचे प्राण वाचले. खाम नदीच्या काठावरील हिलाल कॉलनी, जलाल कॉलनीत पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांतील संसाराेपयाेगी साहित्य भिजले हाेते. बुधवारी पूर ओसरल्यानंतर भिजलेले धान्य वाळवण्यासाठी धडपड सुरू हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.