आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजड वाहनचालकांच्या बेदरकार व निष्काळजीपणामुळे शहरात बारा तासांत तीन अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. पहिला अपघात शेंद्रा, दुसरा दौलताबाद तर तिसरा चिकलठाणा परिसरात घडला. मृतांमध्ये दोन तरुणांसह कांदा साठवायला निघालेल्या शेतकऱ्याचा समावेश आहे.
शेंद्रा एमआयडीसीतील कुंभेफळ येथे पहिला अपघात झाला. एन-६, अविष्कार कॉलनी येथील दीपेश संजय प्रसाद दीक्षित याचा सुसाट जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. दीपेश फायनान्स कंपनीत काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. शुक्रवारी कामानिमित्त तो कुंभेफळ परिसरात दुचाकीने गेला होता. काम आटोपून घराकडे येताना पहाटे तीन वाजता लिबेर चौकात मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्याला धडक दिली.
यात तो दुचाकीसह आधी दुभाजकावर आदळला व नंतर पुन्हा रस्त्यावर कोसळला. मागून आलेली सुसाट कार पुन्हा त्याच्या अंगावरून गेली. चालकाचाही ताबा सुटल्याने कार उलटून त्यातील प्रवासी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला घाटीत दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दीपेशला एक लहान भाऊ आहे. घरातील कर्ता मुलगा गेल्याने आई- वडिलांना धक्का असह्य झाला. शवविच्छेदन विभागाबाहेर त्याच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती.
शेतात जाताना वाहनाची धडक
माळीवाडा परिसरातील शेतकरी रामलाल लक्ष्मण पल्हाळ (७७) यांचे त्याच परिसरात शेत आहे. पावसामुळे कांदा खराब होईल, म्हणून ताे सुरक्षित साठवून ठेवण्यासाठी शनिवारी सकाळी दुचाकीने शेताकडे निघाले. फतियाबाद रस्त्यावर चारचाकी वाहनाने मागून धडक दिली. यात रामलाल यांचा जागीच मृत्यू झाला.
गॅस सिलिंडरच्या ट्रकने तरुणांना उडवले, एक ठार, दाेघे जखमी
दुसऱ्या घटनेत चिकलठाण्याच्या बाजारतळासमोर गॅस सिलिंडर घेऊन निघालेल्या ट्रक चालकाने ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांना उडवले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. शनिवारी दुपारी दीड वाजता हा अपघात घडला. अक्षय सतीश बडदे (१९, रा. शेवगाव, जि. अहमदनगर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
भगवान अप्पासाहेब गोरे (२४) आणि सद्दाम जानुभाई शेख (२१) हे जखमी झाले. अक्षय छोट्या मालवाहू गाडीचा चालक होता. शनिवारी शेवगाववरून तो शहरात आला होता. भगवान व सद्दामसोबत काम करून त्याने त्याची गाडी उभी केली. त्यानंतर दुचाकीवर भगवानच्या बहिणीला भेटण्यासाठी चिकलठाण्यात गेले. तेथून पुढे बिडकीनकडे अक्षयच्या मावशीकडे जाण्याचे ठरले. मात्र, चिकलठाणा बाजारतळासमोर गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात अक्षय थेट चाकाखाली येऊन मृत्युमुखी पडला. पाेलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले अाहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.