आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी कारभार:फार्मसीच्या मुलींसाठी वसतिगृहात लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बस्तान

औरंगाबाद / गिरीश काळेकर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानपुऱ्यातील शासकीय फार्मसी महाविद्यालयातील मुलींसाठी सरकारने वसतिगृह उभारले. मात्र पाण्याची सोय, फर्निचर नसल्यामुळे अद्याप यात वसतिगृहात मुलींना प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र नॅशनल लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात हे वसतिगृह उपलब्ध करून देण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे फार्मसी कॉलेजच्या मुलांसाठीही वसतिगृहाची सोय झालेली नाही. मराठवाड्यात एकमेव असलेल्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात डी. फार्मसी, फार्म डी, एम.फार्मसी अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. साधारणत: साडेचारशेपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाला मुलींचे वसतिगृह मंजूर असताना विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन शिकावे लागत आहे, तर मुलांसाठी वसतिगृहाची व्यवस्था अद्याप झालेली नाही.

२००९ साली शासनाने या मुलींच्या वसतिगृह उभारणीला मंजुरी दिली होती. यानंतर २०१४-२०१५ ला बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. ३६ मुलींच्या क्षमतेची इमारत बांधण्यासाठी १ कोटी ४५ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र काही वर्षे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने साहित्य चोरीला गेले होते. यावर ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित करून वसतिगृहाच्या बकाल अवस्थेचे चित्र समोर आणले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे महाविद्यालयाने पाठपुरावा केला व पुन्हा दुरुस्ती करून २०१९ साली वसतिगृह महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आले.

फार्मसीच्या मुलांसाठीही वसतिगृह नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे महाविद्यालयाने त्यासाठी पत्र पाठवले होते. त्यानंतर जागेची पाहणी केली होती. परंतु महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस वसतिगृहासाठी असलेल्या नियोजित जागेवर आता जलकुंभ उभारले जाणार असल्याने मुलांचे वसतिगृहही होण्याबाबत साशंकता आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी कॉलेजच्या पाठीमागे वसतिगृहाचा प्रस्ताव वरिष्ठांपर्यंत पाठवला होता, परंतु निधी नसल्याने प्रतिसाद मिळाला नाही, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी सांगितले.

तीन वर्षांचा मालमत्ता कराचा भुर्दंड तीन वर्षांपूर्वी वसतिगृह महाविद्यालयाच्या ताब्यात आले. मात्र महाविद्यालयातील विद्यार्थिनींना त्याचा फायदाही झालेला नाही. असे असताना गेल्या तीन वर्षांत ४ लाख रुपये मालमत्ता कराचा बोजा मात्र महाविद्यालयावर पडला असल्याची माहिती समोर आली.

नळ कनेक्शनसाठी पैसे भरूनही मनपाकडे खेटे या वसतिगृहात गरम पाण्यासाठी टँक आणि सोलार सिस्टिम बसवण्यात आली. तसेच महाविद्यालयाने मुख्य रस्त्यापर्यंत नळ कनेक्शन फिटिंगसाठी पीडब्ल्यूडीकडे २ लाख रुपये भरले, तर वसतिगृहापर्यंत नळ कनेक्शन जोडण्यासाठी मनपाकडे ९६ हजार रुपये भरले. मात्र तरीही कनेक्शन मिळालेले नाही. या कनेक्शनसाठी रस्ता खोदावा लागणार असल्याने परवानगी मनपाच्या लालफितीत अडकली आहे.

बातम्या आणखी आहेत...