आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय मिळालाच नाही:‘आम्ही पोलिस ठाणे विकत घेऊ’ असे म्हणत आरोपी करायचे छळ, 3 महिन्यांत 4 गुन्हे तरी आरोपी मोकाट

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेलिस आयुक्तालयात गुरुवारी दुपारी जाळून घेतलेल्या सविता दीपक काळे (३४, रा. मांडवा, ता. गंगापूर) हिचा उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. शेजारी आणि पतीकडून छळ हाेत असल्याची तक्रार करूनही पाेलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तिने मृत्यूला कवटाळले.

चार गुन्हे दाखल होऊनही ठोस कारवाई न झालेल्या आरोपींना पोलिसांनी तिच्या मृत्यूनंतर ताब्यात घेतले. पती दीपक काळे, शेजारी संगीता शेळके, अशोक शेळके, गोकुळ शेळके व पोलिस हवालदार नारायण दशरथ गायकेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

काही वर्षांपासून संगीताला पती अशोक, मुलगा गोकुळ मारहाण करत होते. दीपकची संगीतासोबत जवळीकतेची कुणकुण लागल्याने सविताला घाबरवण्यासाठी आरोपींनी पोलिस गायकेचा आधार घेतला. शेळके कुटुंबाच्या जवळ असलेला गायके सवितास धाक दाखवत होता. दीपकदेखील त्याची भीती दाखवून मानसिक छळ करत होता. परिणामी सविताला त्रास असह्य झाला व तिने मे महिन्यात पहिल्यांदा वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर शेळके कुटुंबाने सविता व तिच्या मदतीला येणारा भाऊ श्यामसुंदर काकडे यांच्याविरोधात तक्रार देत गुन्हे दाखल केले. ज्यामध्ये तथ्य नव्हते, परंतु वाळूज पोलिसांनी ते दाखल करून उलट आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केेले, असा आरोप काकडे यांनी केला. असे चार गुन्हे दाखल होऊनही पती दीपक हा वारंवार शेळके व गायकेची बाजू घेत हाेता.

डिझेल टाकून घेतले हाेते पेटवून

पोलिसांकडे जाऊनही न्याय मिळत नसल्याने हतबल सविताने गुरुवारी एक लिटर डिझेल अंगावर ओतून पेटवून घेतले. यात चेहरा व छातीचा भाग जळून गंभीर इजा झाली. घाटीत उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे चार वाजता उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर ५ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.

पोलिसांनी तक्रार सहजपणे घेतली
चार बहिणींमध्ये एकुलता एक असलेला, सविताच्या मदतीला कायम धावून जाणारा भाऊ श्यामसुंदर पहाटे रुग्णालयात उपस्थित हाेता. त्यानंतर दीपकचे भाऊदेखील रुग्णालयात आले. दुपारी १२ वाजता डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह श्यामसुंदर यांच्याकडे सोपवला तेव्हा अश्रू अनावर झाले. खूप सहन केले ताईने. वाळूज ठाण्याच्या साहेबांनी मात्र प्रकरण सहज घेतले. त्रासापोटी तिने इच्छा नसताना मोठ्या मुलीचे लहान वयात लग्न लावले. पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या. तिने आणखी काय करायला हवे होते, असा उद्विग्न प्रश्न त्यांनी केला. सायंकाळी अंत्यसंस्कार करून बेगमपुरा ठाण्यात तक्रार देण्यासाठी ते दाखल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...