आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची पोलिसात तक्रार:‘कोविन अ‍ॅप’ हॅक करून डोस न घेताच लसीचे प्रमाणपत्र मिळवणारे रॅकेट सक्रिय; डीकेएमएम केंद्रावर 55 जणांना डोस, नोंदणी 71 ची

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘त्या’ लाभार्थींचे फोन बंद

आरेफ कॉलनी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या डीकेएमएम केंद्रावर कोरोना लसीकरण झालेल्या लाभार्थींच्या ऑनलाइन नाेंदणीत हॅकिंग झाल्याची तक्रार महापालिका प्रशासनाने पाेलिसांकडे केली आहे. २८ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. लस न घेता केवळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही लोकांनी काेविन पाेर्टल किंवा अॅप हॅक करत अशा नाेंदी केल्या असल्याचा प्राथमिक संशय आहे. शनिवारी डीकेएमएम महाविद्यालयात लसीकरण सुरू होते. डाेस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या कमी होती. पहिल्या टप्प्यात ५५ टोकन वाटण्यात आले. प्रत्येक व्यक्तीची आधी रजिस्टरमध्ये नाेंदणी करून नंतर काेविन पोर्टलमध्ये नोंद घेतली जात हाेती.

सर्व ५५ जणांचे लसीकरण झाल्यानंतर डाटा ऑपरेटर शकील खान यांनी सगळ्या नोंदी बरोबर झाल्या आहेत का हे पाहण्यासाठी अॅप तपासले तेव्हा त्यांना या केंद्रावर ७१ जणांच्या नाेंदी दिसून आल्या. त्यांनी ही माहिती वॉररूमच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख हेमंत राठोड यांना दिली. त्यांनी तत्काळ या केंद्रावरील लसीकरण थांबवले व आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा आणि अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे यांना ही माहिती दिली. आतापर्यंत या केंद्रावर ऑपरेटर शकील हे स्वत:च्या लॅपटॉपवर ऑनलाइन नाेंदी करत हाेते. मात्र शनिवारी पहिल्यांदाच महाविद्यालयाच्या संगणकातून नोंदणी करण्यात सुरुवात केली हाेती, त्याच दिवशी हा प्रकार घडला. या आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अंबरीन यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पाेलिस करत आहेत.

सक्तीमुळे गैरमार्ग
काही खासगी कंपन्यांत आणि कार्यालयात लसीकरण केल्याशिवाय कामावर हजर राहू दिले जात नाही. शिवाय लोकल, हॉटेल, मॉल येथेदेखील लसींचे दाेन्ही डाेस बंधनकारक केले आहेत. त्यामुळे गैरसमज असल्याने ज्यांना लस घ्यायची नाही असे लाेक गैरमार्गाचा अवलंब करून लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मनपाकडूनदेखील कर्मचाऱ्यांची विचारपूस केली जाईल, अशी माहिती आराेग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

माहिती असूनही कानाडोळा
वेब पोर्टल हॅक करून लस न घेता प्रमाणपत्र घेतले जात असल्याचे यापूर्वी समोर आले होते. मात्र यासंबंधी कोणतीही तक्रार आलेली नव्हती. त्यामुळे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले होते. मात्र आता मनपाच्या केंद्रावरच असा प्रकार समोर येताच आरोग्य विभागाचे डोळे उघडले. चौकशी होईपर्यंत डीकेएमएम हे केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

‘त्या’ लाभार्थींचे फोन बंद
आराेग्य केंद्रावर ज्या ५५ जणांनी प्रत्यक्ष हजर राहून लस घेतली, त्यांची नावे रजिस्टरमध्ये नाेंद हाेती. त्याशिवाय अॅपमध्ये ज्या अतिरिक्त १६ जणांची नावे व नंबर हाेते, त्यांना मनपाच्या मुख्यालयातून हेमंत राठाेड यांनी तत्काळ फाेन लावले. ‘तुम्ही कुठे लस घेतली आहे का?’ अशी विचारणा त्यांना करणार हाेते. मात्र मनपातून फोन जाताच हे सगळे फोन बंदच हाेते. असे गैरप्रकार हाेऊ नयेत म्हणून दरराेज रजिस्टरमधील नाेंदी व प्रत्यक्ष किती जणांनी लस घेतली हे तपासले जात असल्याचे राठाेड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...