आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी मुलाखत:आंदोलने, राजकीय मेळावे, बैठका सुरू; मग नाट्यगृहे बंद का : अभिनेते संदीप पाठक

औरंगाबाद / मंदार जोशी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात आंदोलने सुरू आहेत, राजकीय मेळावे, बैठकांनाही परवानगी आहे. मग नाट्यगृहे बंद का, असा सवाल प्रसिद्ध अभिनेते, रंगकर्मी संदीप पाठक यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाचे नियम रंगभूमीसाठीच आहेत का? गेल्या दोन वर्षांपासून नाट्यगृहे बंद आहेत. नाटकासाठी पडदा उघडला नाही, घंटा वाजली नाही, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणि आसू नाही. टाळ्या आणि शिट्यांचा आवाज ऐकण्यासाठी कलाकार व्याकूळ झाले आहेत. प्रेक्षकांनासुद्धा रंगमंचावरील पडदा कधी बाजूला सरकतो असे झाले आहे. नियम-अटी घालून पुन्हा नाट्यगृहे सुरू करायला हवी. त्यामुळे अनेकांचे रोजगार सुरू होतील, अशी अपेक्षा संदीपने व्यक्त केली. संदीप पाठक यांनी २३ सप्टेंबर रोजी दिव्य मराठीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी विविध विषयांवर संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. मागील दोन वर्षांपासून नाट्यगृहे बंद झाल्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे.

प्रामुख्याने बॅकस्टेजवर काम करणाऱ्या कलाकारांना अगदी भाजी विक्रीपासून इतर गोष्टी कराव्या लागत आहेत. अभिनय क्षेत्रात नव्याने आलेल्या कलाकरांनादेखील खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे अनेक कलाकार बेचैन झाले आहेत. प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद हीच खऱ्या कलाकाराची एनर्जी आहे. ही एनर्जी मिळत नसल्यामुळे कलाकार बेचैन झाले आहेत. नाटकांवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचे ओटीटी प्लॅटफॉर्म अधिक मनोरंजन करू शकत नाही. त्यामुळे मानसिक तणाव, नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी पुन्हा एकदा रंगभूमी आणि प्रेक्षकांमधील हे गिव्ह अँड टेक सुरू व्हायला पाहिजे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर काही काळाकरिता नाट्यगृहे सुरू केली हाेती. त्या वेळी कोरोनाचे नियम पाळून हाऊसफुल्ल प्रयोग झाले. या ठिकाणी कुठलेही नियम मोडले गेले नाहीत. मुळात नाटकाला येणारा प्रेक्षक हा सुसंस्कृत असतो. असे असतानादेखील नाटकांसाठी परवानगी मिळत नाही. यावर विचार व्हायला पाहिजे, असे पाठक यांनी सांगितले. संदीप यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राख’ या सिनेमाची या वर्षी टोरंटो फेस्टिव्हलसाठी निवड झाली, तर एकलव्य सिनेमाची सध्या शूटिंग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वऱ्हाड मराठवाड्याची ओळख
वऱ्हाड निघालंय लंडनला ही एक अजरामर कलाकृती आहे. वेरुळ, अजिंठा लेण्यांतील शिल्पे जशी मराठवाड्याची ओळख आहे. त्याचप्रमाणे प्रा. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांची ही कलाकृती मराठवाड्याची ओळख झाली आहे. मला ती जपण्याची संधी मिळते, हे मी माझे भाग्य समजतो. माझे शरीर जोपर्यंत साथ देईल, तोपर्यंत वऱ्हाडची शाल मी जपणार आहे. त्यानंतरही पुढच्या कलाकारांनी जपावी. आतापर्यंत देशपांडे सरांनी केलेले प्रयोग प्रेक्षकांनी पाहिले. माझे प्रयोगसुद्धा अनेकांनी पाहिले. मात्र, हाच प्रेक्षक पुन्हा वऱ्हाडची जाहिरात आल्यानंतर आपोआप नाट्यगृहाकडे वळतो. अगदी मेलबर्न, कॅनडापासून, तर दिग्रसपर्यंत नाटकाचे प्रयोग करण्याची संधी मला मिळाली. आतापर्यंत नाटकाचे ४०० प्रयोग झाले. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

‘मला अंबानीचं घर नको, नाट्यप्रयोग हवाय’
समोर कोणी टाळी वाजवणारं नाही, तो हशा नाही. डोळ्यांत अश्रू नाहीत. नाटकच नाही. त्यामुळे सगळे कलावंत आतून हलले आहेत. “मला अंबानीचं घर नको पण थिएटरमधला एक प्रयोग हवाय” असं संदीप पाठक सांगतात. लॉकडाऊन काळात अगदी घरातील लोकांना आणि कामासाठी येणाऱ्या मावशींना बसून मी वऱ्हाड सादर केले. जेवढे प्रेक्षकांना कलाकार हवे आहेत, तेवढेच कलाकारांनादेखील प्रेक्षक हवे आहेत. हे नातं टिकवण्यासाठी हालचाली होतील, अशी अपेक्षा पाठक यांनी या वेळी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...