आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ग्रामविकासाचे मॉडेल म्हणून देशात गाजलेल्या पाटोद्यातही निवडणुकीची धामधूम नाही. विशेष म्हणजे पाटोद्याचे नाव सर्वदूर होताना ज्यांचा विकासपुरुष म्हणून गौरव झाला ते बहुचर्चित सरपंच भास्कर पेरे पाटलांचे पॅनल निवडणूक लढवत नसल्यामुळे तब्बल २५ वर्षांनी येथे सत्तांतर होत असताना गावाच्या परिघावरील वस्त्यांमधून मात्र या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
औरंगाबादपासून १३ किलोमीटर अंतरावर पाटोदा ग्रामपंचायतीचा आगळावेगळा फलक आपलं स्वागत करतो. स्वच्छ रस्ते, शुद्ध पाणी, मोफत गिरणी याची माहिती आठवतच खाम नदीवरील पूल ओलांडून गावात प्रवेश केला. पहिल्यांदा भेटले रामाजी साबळे, पण ते निवडणुकीबद्दल काही बोलायलाच तयार नव्हते. पुढे चाळिशीतील संजय पेरे म्हणाले, अाठ जण अविरोध आले एवढेच सांगू शकतो. राजकरणाबाबत बोलू शकत नाही. चकाचक रस्ते, घरावर स्त्री-पुरुषांच्या नावाच्या पाट्या आणि हिरवळ बघत गावाच्या दुसऱ्या टोकाला एकलव्यनगरमध्ये पोहाेचलो, त्यावेळी मात्र समस्या सांगणाऱ्यांनी एकच गराडा घातला. गावातील एकूण १७१९ पैकी ५१४ मतदार मागासवर्गीय अाहेत.
कर भरू की पोट भरू?
एकलव्य वस्तीवर गेल्यावर कळतं, कर भरणाऱ्यांनाच त्या “आदर्श’ सुविधा मिळतात. वस्तीत भिल्ल समाजाची ८० मते आहेत. काहींना शबरी योजनेतून घरे मिळाली आहेत, बाकीचे खुराड्यागत घरांमध्ये जगताहेत. आम्ही पोट भरायचं की घरपट्टी? हा इथल्या लताबाई माळींचा प्रश्न ‘अादर्श’तेचा पर्दाफाश करताे. “ते आमच्यापासून योजना दाबून ठेवतात. कर भरला तरच शुद्ध पाणी, मोफत दळण देऊ म्हणतात. १० रुपयांत जार नाही तर गावातून पाच रुपयांत पाण्याचा हंडा विकत घ्यावा लागतो,’ लताबाईंसाठी हा अभिमान नाही तर वेदना आहे. गोरखनाथ पवारांचे गुडघे कामातून गेलेत. त्यांना शेतात काम जमत नाही. ते म्हणाले, श्रावणबाळ, संजय गांधी किंवा अपंग, आरोग्याच्या कोणत्याच योजना मिळत नाहीत. आधी कर भरा असा तगादा लावतात. आम्ही कोठून आणायचा पैसा? रोजगार हमीच्या कामासाठी अंगठे नेले, पण अजून काम मिळालेले नाही.
गरिबांचा विकास करू
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर स्मारक उभारून गावाचा विकास करणार आहोत. तेथील झोपड्यांना शासकीय योजनेतून घरकुल देऊ. करासंबंधीच्या जाचक अटी रद्द करू. विकासकामे करताना गरिबांचा जगण्याचा हक्क अबाधित राहील, त्यांना माणूस म्हणून जगता येईल याकडे लक्ष देऊ. गरिबांनाही ग्रामपंचायत आपली वाटावी यासाठी प्रयत्न करू. - कपिंद्र पेरे पाटील, लोकशाही ग्रामविकास पॅनल
नियम लावले तरच विकास
आजचा जमाना विनोबा भावे, महात्मा गांधी, तुकाराम महाराज यांचा राहिलेला नाही. ७० वर्षांपूर्वीच ते दिवस गेले. गावाला सुविधा देण्यासाठी सरकार पैसे देत नाही. मग आम्ही फुकट सुविधा कशा द्यायच्या? ज्या सुविधा मी दिल्या त्या महाराष्ट्रात कोणतीच ग्रामपंचायत देत नाही. यामुळे काटेकोर नियम लावावेच लागतात. तसे न केल्यास देशाचा विकास होणार नाही. मुलीचा निर्णय स्वत:चा. - भास्कर पेरे पाटील, मावळते सरपंच
घाबरून कुणी बोलत नाही
गाव सुधरवला, पण आमच्या गल्ल्यांचा विकास केला नाही. योजनांसाठी रहिवासी प्रमाणपत्र लागतं, ते देण्यासाठी पाच हजार मागतात. तेवढे पैसे असते तर योजनेसाठी लोक का आले असते? आम्हाला कोणत्याच सुविधेचा लाभ मिळालेला नाही. कर कमी करण्यासाठी आजवर कोणी बोलले नाही. सगळे लोकं मुख्य माणसाला घाबरत होते. त्यांच्या धाकाने कोणी बोलत नव्हते. आता आम्ही आवाज उठवू. - छाया मोरे, नवनिर्वाचित सदस्य
विकासाची शिक्षा आम्हाला का?
तुम्ही इथपर्यंत पोहाेचणारे पहिले पाहुणे. बाकीच्यांना गाव दाखवून टोकावरूनच परतावले जाते. ते लोकं आम्हाला वेडं म्हणतात. त्यांना विकास करायचाच, बक्षिसे मिळवायचीय, पण त्याची शिक्षा आम्हाला का? आमच्याकडे कर भरण्यासाठी पैसे नाहीत, पत्र्याच्या खोलीत पाच जण राहतो. घरकुल योजनेसाठी अर्ज केला तर सहा हजारांचा कर भरायला सांगितला. तो भरला तरी घरकुल मिळाले नाही. आम्हाला गावातले समजत नाहीत हे लोकं. - कमल पवार, त्रस्त ग्रामस्थ
पहिल्यांदा अविरोध
लाेकसंख्या - 3350
मागासवर्गीय - 330
आदिवासी - 184
मतदान - 1719
नवमतदार - 225
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.