आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्टिमेटम दिवस:राज्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त, अनेक ठिकाणी मनसैनिकांची धरपकड, भोंग्यांचा आवाज मर्यादित; राज्यात शांतता

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. - Divya Marathi
अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत भोंग्यांबाबत ४ मेचा अल्टिमेटम दिला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मशिदींवरील भोंग्याचा आवाज कमी राहिला व अनेक ठिकाणी अजान झाली नाही. मनसैनिकांनी काही ठिकाणी आरती व हनुमान चालिसाचे पठण केले. दोन्ही समाजातील बांधव शांत राहिले.

सोलापूर : मारुती मंदिरासमोर भोंग्याविना मनसेचा हनुमान चालिसा
सोलापूर शहरात व पंढरपूर शहरात एकाही प्रार्थनास्थळांत बुधवारी अजानवेळी भोंगे वाजले नाहीत. पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे प्रार्थनास्थळांवरील भोंगे बंद ठेवण्यात आले. शहरात सोन्या मारुती मंदिरासमोर मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा म्हटले, पण तेथे पोलिसांनी भोंग्याचा वापर होऊ दिला नाही. कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या गेल्या. पंढरपूर शहर पोलिसांनी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांना नोटीस बजावली. नमाजही शांततेत पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

सातारा : भोंग्याविना अजान आणि नमाज करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय
सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान व नमाज करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. बुधवारी प्रमुख मुस्लिम बांधवांची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय साताऱ्यातील सर्व गावांतील व तालुक्यातील मशिदींना कळवण्यात येणार आहे. आज गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई व पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी साताऱ्यातील राजपथावरील शाही मशीदमध्ये सलोखा बैठक आयोजित केली होती. यामध्ये सर्वधर्मीयांनी नियमांचे काटेकोर पालन करावे व समाजामध्ये शांतता राहील असे प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केले.

नागपूर : हनुमान मंदिरचे अध्यक्ष करणार मनसे कार्यकर्त्याविरुद्ध तक्रार
नागपुरात मनसेकडून ३२ ठिकाणी आरती व हनुमान चालिसा पठाणची परवानगी मागितली होती. दुपारनंतर केवळ सोनेगाव मंदिरात आरतीची परवानगी मिळाली. त्यानंतर परिसरात असलेल्या मशिदीच्या दिशेने भोंगे करून कार्यकर्त्यांकडून आरती करण्यात आली. सोनेगाव गणेश हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष शंकरराव बळवंतराव सणस यांनी आपण आयोजकांची तक्रार करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आपण मंदिरात केवळ आरती करण्याची परवानगी दिली होती. आरती करण्याला आपला विरोधही नव्हता. पण, घोषणाबाजी व राजकीय शेरेबाजीला विरोध होता.

नाशिक : गनिमी काव्याने चालिसा पठण
नाशिकमध्ये पोलिसांनी पहाटे ४ वाजेपासूनच मंदिर आणि मशिदीसमोर कडक बंदोबस्त लावला होता. मात्र नाशिकरोड येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत विभाग अध्यक्ष विक्रम कदम व महाराष्ट्र राज्य उपचिटणीस बंटी कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोकडोबावाडी येथील हनुमान मंदिरात महाआरती करीत हनुमान चालिसाचे पठण केले. तसेच संपूर्ण दिवसभर वातावरण शांत होते, तर पोलिसांनी नमाजच्या वेळेस मशिदीबाहेर बंदोबस्त ठेवला होता. मशिदीमधील नमाज पठणच्या वेळीही आवाज अल्प प्रमाणात होता.

वाशिम : अजाननंतर हनुमान चालिसा
वाशिम शहरात सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी शिव चौकातील जामा मशिदीवर भोंग्यावर अजान सुरू झाल्यानंतर जुन्या पोस्ट ऑफिसजवळील हनुमान मंदिराबाहेर मनसेच्या वतीने भोंग्यावर हनुमान चालिसा वाजवण्यात आले. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे कुठलाही तणाव निर्माण झाला नाही.

अकोला : काही ठिकाणी अजान बंद
जिल्ह्यात बुधवारी मुस्लिम बांधवांनी शांततेची आणि सामंजस्याची भूमिका घेत भोंग्यावरील सकाळची अजान टाळली, तर दुपारच्या अजानचा आवाजसुद्धा मर्यादेत ठेवण्यात आला होता. त्यामुळे अकोल्यात कुठेही ‘मनसे’ला भोंगे वाजवण्याची संधी मिळाली नाही. पोलिसांनी सर्वधर्मीयांना नियमांचे पालन करून शांततेच्या सूचना दिल्या होत्या, त्याचे पालन झाले.

यवतमाळ : ट्रस्टींनी घेतली परवानगी
यवतमाळ येथे याकरिता शहरातील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात मौलवी आणि ट्रस्टींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत ३८ मौलवी व ट्रस्टींनी रीतसर अर्ज करीत भोंग्याबाबत परवानगी घेतली. मशिदींवरून भोंगे लावून आणि न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार कमी डेसिबलने अजान दिल्यास कायद्याचे पालन होईल याची ग्वाही दिली.

पुणे : ३० जणांवर कार्यवाही, शहराध्यक्षाविना आंदोलन
पुण्यात खालकर मंदिरात आज मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. चालिसा पठणानंतर काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ जण, तर विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई पोलिस कायदा ६८ प्रमाणे कारवाई करण्यात आली. मनसेच्या २३४ कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ नुसार नोटीस बजावली. ५५ जणांवर मुंबई पोलिस कायदा ६८,६९ नुसार कारवाई करण्यात आली, तर सीआरपीसी १५१ प्रमाणे ३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. बुधवारी मोरेंच्या जागी नियुक्त करण्यात आलेले नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याविना आंदोलन पार पडले.

बातम्या आणखी आहेत...