आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसंवाद:सत्तार, भुमरेंच्या बालेकिल्ल्यात आदित्यचे मेळावे ; 8 रोजी पैठणमध्ये शेतकरी मेळावा

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे कुटुंबीय केवळ मातोश्रीवर मुक्काम ठोकून आहेत, अशी टीका बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून होत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ नोव्हेंबरला चिखली (ता. बुलडाणा) येथे शेतकरी मेळावा घेत आहेत. तर आदित्य ठाकरे ७, ८ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर प्रखर हल्ला करण्यासाठी ते पैठण व सिल्लोडमध्ये कार्यक्रम घेणार आहेत. त्या दृष्टीनेच दौऱ्याची आखणी होत असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

सत्तांतरानंतर उद्धव व आदित्य यांनी गटप्रमुखांपासून ते स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. एकाच दिवसात ते २०० ते २५० जणांना भेटत आहेत. पण त्याचे केंद्र मातोश्रीच आहे. दिवाळीपूर्वी उद्धव ठाकरे अर्धा, पाऊण तासासाठी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन ते परतले. त्यामुळे त्यांच्यावर ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरण्यास तयार नाहीत, अशी टीकेची झोड उठवली जाऊ लागली. उद्धव यांचा बुलडाणा दौरा महिनाअखेरीस होत आहे. त्याला बराच अवधी आहे.

म्हणून पहिल्या टप्प्यात आदित्य यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात फिरावे, असा आग्रह मातोश्रीवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी धरला. त्याला आदित्य यांनी मान्यता दिल्यावर औरंगाबादची निवड करण्यात आली. त्यातही पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले. कारण गेल्या काही दिवसांपासून सत्तार आणि भुमरे सातत्याने उद्धव व आदित्य यांच्या थेट टीका करत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक होण्याची गरज असल्याचा सूरही बैठकीत लावण्यात आला.

शिरसाट यांच्या मतदारसंघातही चाचपणी
अंबादास दानवे यांनी सांगितले की, ७ नोव्हेंबर रोजी आदित्य सिल्लोडला जातील. तेथे शिवसंवाद मेळाव्यात भूमिका मांडतील. तेथून पुन्हा औरंगाबादला येऊन मुक्काम करतील. ८ नोव्हेंबर रोजी पैठण येथे शेतकरी मेळावा घेणार आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात काही कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकते का, याची चाचपणी होत आहे, असेही दानवे यांनी सांगितले.

शिंदेंच्या सभेपेक्षा जास्त गर्दीचे नियोजन
सत्तांतरानंतर आदित्य यांनी भुमरे यांच्या मतदारसंघात बिडकीन येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विक्रमी गर्दीचा मेळावा घेतला होता. त्याआधी अब्दुल सत्तार यांनीही मुख्यमंत्र्यांची सिल्लोडमध्ये जंगी जाहीर सभा घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर आदित्य यांच्या दौऱ्यात अधिकाधिक गर्दी जमवण्याचे नियोजन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...