आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत नोकरभरतीला झाली सुरुवात:अनुकंपातील 64 जणांचा प्रशासकांनी जाणून घेतला कल, टप्प्याटप्प्याने सर्व पदे भरणार

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली नोकरभरतीची प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. पहिल्या टप्प्यात अनुकंपा भरतीला सुरुवात झाली. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अनुकंपा तत्त्वावर गट-क व गट-ड संवर्गात एकूण ६४ उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी गुरुवारी सर्व उमेदवारांना समक्ष बोलावून त्यांचा कल जाणून घेतला.

या सर्व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना लवकरच नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश देणार अाहेत. यात लिपिक-टंकलेखक १८, लेखा लिपिक-०५, वाहन चालक-०१, शिपाई-२१, स्मशानभूमी रक्षक-०१, सफाई कामगार १८ यांचा समावेश आहे. विविध झोन कार्यालयांत व विभागात विशेषतः लेखा विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे, अशी माहिती आस्थापना विभागातून देण्यात आली. इतर भरतीची प्रक्रियादेखील आता शेवटच्या टप्प्यात आहे. मनपाने बिंदुनामावली तयार करून मान्यतेसाठी पाठवली आहे. मनपाच्या उत्पन्नातील ३५ टक्क्यांपेक्षा अधिक खर्च मनुष्यबळावर करता येणार नाही, असा नियम असल्यामुळे ही नोकरभरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.

अशी भरणार पदे; २५ टक्के पदे प्रतिनियुक्तीने भरणार {मनपातील अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त ही पदे ५० टक्के पदोन्नतीने भरणार असून, ५० टक्के शासनाकडून प्रतिनियुक्तीने भरणार. { उपायुक्तांची सहा पदे असून, त्यापैकी तीन पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे असून, त्यापैकी एक पद पदोन्नतीने भरण्यात येणार आहे. { सहायक आयुक्तांची ५० टक्के पदे पदोन्नतीने, तर २५ टक्के पदे सरळ सेवा भरतीनुसार भरणार आहेत. { २५ टक्के पदे शासनाकडून प्रतिनियुक्तीने भरली जाणार आहेत. नवीन पद्धतीनुसार, नोकरभरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या संस्थांमार्फतच प्रक्रिया राबवावी लागते.

९५३ पदांना मंजुरी : जुन्या आकृतिबंधातील मंजूर पदानुसार सध्या साडेपाचशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान, राज्य शासनाने महापालिकेच्या नव्या आकृतिबंधात ९५३ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे. महापालिका एक हजारापेक्षा जास्त जणांची नोकरभरती करू शकते. पण, सेवा भरती नियमांची फाइल मंजूर झाल्यानंतरच हे शक्य आहे.

महापालिकेत तीन हजार कर्मचारी कंत्राटी मनपात अनेक वर्षांपासून भरती झाली नाही. त्यामुळे बहुतांश विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहेत. सफाई, पाणीपुरवठा या विभागांत कर्मचाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. सध्या मनपात सुमारे तीन हजार कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यांच्या पगारासाठी दरमहा सुमारे दोन कोटी रुपये संबंधित संस्थांना देण्यात येतात. शिवाय अनेक महत्त्वाची कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांना देता येत नाहीत. त्यामुळे कामांची गतीदेखील कमी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...