आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:रात्री कलेक्टर बंगल्यासमोर 400 विद्यार्थ्यांनी ठिय्या दिल्यानंतर सकाळीच किलेअर्क वसतिगृहाची तपासणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किलेअर्क भागातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील ४०० विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर जाऊन ठिय्या आंदोलन केले. मेसमधील निकृष्ट जेवणासह इतर समस्यांबाबत त्यांची प्रमुख तक्रार होती. हे प्रश्न त्वरित सोडवण्याचे आश्वासन देऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रात्री विद्यार्थ्यांना परत पाठवले. सोमवारी सकाळी एका दिव्यांग विद्यार्थ्याला मेसचालकाने अपशब्द वापरल्यानंतर पुन्हा आक्रमक झाले. दरम्यान, तक्रारींची दखल घेत पुणे येथील समाजकल्याण विभागाचे पथकही शहरात दाखल झाले व त्यांनी वसतिगृहाची पाहणी केली.

समाजकल्याण विभागामार्फत किलेअर्क भागात एक हजार विद्यार्थी राहू शकतील इतके मोठे वसतिगृह उभारले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्थेसह स्टेशनरी, युनिफॉर्म व इतर भत्ते दिले जातात. मात्र मागील एक वर्षापासून भत्ते मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. जेवणही निकृष्ट देत असल्याच्या वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नव्हते.

दर आठवड्याला बुधवार व रविवारी मांसाहारी किंवा गोड पदार्थासह जेवण दिले जाते. पण रविवारी (२ अॉक्टोबर) ना चिकन मिळाले ना गोड पदार्थ. त्यामुळे आधीच संतापलेले विद्यार्थी जास्त आक्रमक झाले. पिण्यासाठी, वापरण्यासाठी पुरेसे पाणी नाही, मेसचालक मनमानी कारभार चालवतात, जाब विचारल्यास मेसवाला महिलेला पुढे करून नको ते आरोप लावतात, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी सोमवारी समाजकल्याण सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे यांच्याकडे केल्या. मेसचालकाने चांगले जेवण द्यावे तसेच संबंधित महिलेला कामावरून काढण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. वाबळे यांनी त्वरित त्या महिलेस कामावरून काढण्याचे आदेश दिले. तसेच वॉर्डनला विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्याच्या सूचना दिल्या.

मेसचालक धमकी देतो
विद्यार्थी शुभम पडघने म्हणाला,‘ठरवून दिलेला निधी, सुविधा द्याव्यात यासाठी प्रशासनाला चार वेळा निवेदन दिले. पण उपयोग झाला नाही. मेसचालकाच्या मनमानी कारभाराची तक्रार केली तर मेसचालक धमक्या देतात. शिवीगाळ करतात. अधिकारीही एेकत नाहीत. तर ‘चालू शैक्षणिक वर्षाचा निर्वाह भत्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही. आठशे रुपये मिळतो तो वाढवून बाराशे करण्यात यावा’, अशी मागणी भाऊसाहेब सोनवणे याने केली.

भत्त्याचा निधी आला की लगेच देणार
विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. अधिकाऱ्यांनाही तक्रार निवारणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसोबत वाद घालणाऱ्या मेसमधील महिलेला कामावर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध भत्त्यांसाठीचा निधी आलेला नाही. तो आल्यानंतर त्वरित त्यांना देण्यात येईल.
- पांडुरंग वाबळे, सहायक आयुक्त, समाजकल्याण

बाहेरच्या मुलांना विरोध केल्याने तक्रारी
रविवारी चिकनचे जेवण देण्यात येते. त्यामुळे हॉस्टेलमधले विद्यार्थी आपल्या बाहेरच्या मित्रांना बोलवतात. त्यामुळे चिकन व जेवण कमी पडते. बाहेरच्या विद्यार्थ्यांना आम्ही विरोध करतो. म्हणून विद्यार्थी अशी भूमिका घेत आहेत. आम्ही त्यांना ठरवून दिल्याप्रमाणे जेवण देतो.- संजय डबडे, मेसचालक

बातम्या आणखी आहेत...