आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • After 75 Years Of Independence, The Airport In Aurangabad, Which Has Been Used For Air Travel Since Nizam's Time, Is Still Waiting For Flight Expansion. |marathi News

दिव्य मराठी विशेष:निजामकाळापासून विमान प्रवासाची सोय असलेल्या औरंगाबादमधील विमानतळाला स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही उड्डाण विस्ताराची प्रतीक्षाच

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश काळात युद्धविमान सरावाची, इंधन भरण्याची सोय असलेल्या औरंगाबाद विमानतळाला आता स्वातंत्र्यानंतर मात्र मुंबई, पुणे वगळता इतर मोठ्या शहरांना हवाईमार्गे जाेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करावा लागत आहे. पर्यटननगरीतील या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा, कार्गो सेवा मिळवण्यासाठी उद्योजक, पर्यटन आणि राजकीय क्षेत्रातील मंडळी सध्या शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र अजूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांच्या माहितीनुसार, स्वातंत्र्यापूर्वीच १९३६ मध्ये औरंगाबादचे विमानतळ कार्यान्वित झालेले होते. त्यावेळी निजाम एअरलाईन नावाने निजामाने विमान सुरु केले. त्यात शाही कुटुंब हैदराबादहून (बेगम पेठ) औरंगाबादला यायचे. त्यानंतर १९४५ मध्ये डेक्कन एअरलाईन्स सुरु झाली. यात निजाम (७१ टक्के) आणि टाटा यांची भागीदारी होती. त्यानंतर निजाम संस्थानचे भारतात विलिनीकरण झाले. तेव्हा डेक्कन एअरलाईन्स इंडियन एअरलाईन्समध्ये विलिन झाली. निजामाची भागीदारी संपली. स्वातंत्र्यानंतर सर्वात आधी औरंगाबादहून एअर इंडियाचे मुंबईसाठी विमान सुरु झाले. त्यानंतर १९७० च्या सुमारास दिल्लीसाठीही विमान सुरू झाले. कालांतराने औरंगाबादच्या पर्यटनाचे महत्त्व सर्वत्र पसरले. त्यामुळे दिल्ली- आग्रा- मुंबई- जयपूर- उदयपूर या मार्गावर विमानसेवा सुरू झाली. एकच विमान या मार्गावर प्रवास करायचे. युनेस्कोने अजिंठा आणि वेरुळ लेणीला १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला अन् संपूर्ण जगाचे लक्ष औरंगाबादकडे वेधले गेले. त्यामुळे या पर्यटन सर्किट जोडणाऱ्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची चांगली साेय झाली व स्थानिक पर्यटन व्यवसाय वाढला, अनेकांना राेजगार मिळाला. या काळात दरवर्षी ६५ हजारांहून अधिक परदेशी पर्यटक अजिंठा- वेरुळला भेट देण्यासाठी येत होते. हा औरंगाबादच्या पर्यटनातील सुवर्णकाळ होता, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत यांनी सांगितले.

राजकीय हस्तक्षेपाने बंद झाली सेवा : एअर इंडियाची ही अनेक शहरांना जाेडणारी दैनंदिन विमानसेवा औरंगाबादसाठी महत्त्वाची ठरली होती. मात्र, राजकारण्यांना दिल्ली गाठण्यासाठी या विमानाने उशीर होत असल्याने थेट दिल्ली विमानाची मागणी झाली. त्यामुळे ही विमानसेवा १९९९ ला एअर इंडियाने बंद केली. परिणामी टुरिझमच्या सर्कलमधून औरंगाबाद वगळले गेले. याचा परिणाम जगभरातून येणाऱ्या पर्यटकांवर झाला अन‌् ही संख्या निम्यावर आली.

खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेतील पहिल्याच भाषणात औरंगाबादेत विमानसेवा बंद असल्याने बेरोजगारी कशी वाढली, हे पटवून दिले. याशिवाय त्यांनी व औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन २०१८-१९ दरम्यान विमानसेवेची संख्या १४ वर नेऊन ठेवली. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, बंगळुरू अशी विमानसेवा सुरू केली. एवढेच नाही तर मुंबई, औरंगाबाद, उदयपूर, जयपूर, दिल्ली या पर्यटनस्थळांना जोडणारी बंद पडलेली विमानसेवाही त्यांच्या प्रयत्नाने सुरू झाली होती. यामुळे पर्यटनाला पुन्हा उभारी आली. मात्र मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले अन‌् औरंगाबाद हवाई वाहतुकीबाबतीत पुन्हा शून्यावर आले होते.

बातम्या आणखी आहेत...