आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“योग मेरा कर्म, एकता मेरा धर्म’ हा संदेश घेऊन पुणे जिल्ह्यातील देहुगाव येथील पूजा तानाजी बुधावले ही तरुणी गेल्या दोन महिन्यांपासून सायकलवर बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तीर्थयात्रेवर निघाली आहे. पूजाने या यात्रेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी नोंदणीही केली आहे. पूजाने ८ आॅक्टाेबरला केदारनाथापासून यात्रा सुरू केली. आतापर्यंत तिने ४६०० किमीचा प्रवास पूर्ण केला. शुक्रवारी ती वेरूळ येथे दाखल झाली हाेती.
पूजाने आतापर्यंत काशी विश्वनाथ, उज्जैन महाकाल, ओंकारेश्वर, दारूकावने नागेश्वर, सोमनाथ, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर असा दोन महिन्यांत साधारण चार हजार सहाशे किमीचा प्रवास पूर्ण केला. बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन शनिवारपासून पुढील प्रवासास ती सुरुवात करणार आहे. यापुढे ती परळी वैद्यनाथ, औंढा नागनाथ, श्री शैलम मल्लिकार्जुन असा साधारण चार हजार किमीचा प्रवास करून ती रामेश्वरम येथे आपल्या प्रवासाचा शेवट करणार आहे. या प्रवासादरम्यान ती अनेक शाळा, संस्थांना भेटी देत योगाविषयी माहिती देत आहे. या प्रवासात पूजाबरोबर प्रा. समीर तहेकर हे गाडीवरून प्रवास करीत असून पूजा हिने रनिंग, स्विमिंग, सायकलिंग या खेळात प्रावीण्य मिळवलेले आहे. याआधी पूजाने डिसेंबर २०१७ मध्ये ३५ दिवसांत काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकलवर साधारण चार हजार किमीचा प्रवास केलेला आहे. पूजा ही वेरूळ येथे आली असता जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, तालुका क्रीडा अधिकारी लता लोंढे, तालुका क्रीडा संयोजक आशिष कान्हेड यांनी अभिनंदन करीत पुढील प्रवासाकरिता तिला शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.