आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव तारी त्याला कोण मारी:गळफास घेतलेल्या तरुणाला साडी कापून वाचवले, बेशुद्ध पण उपचारांना देतोय प्रतिसाद

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायल 112 या पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकामुळे वीस दिवसांमध्ये दुसऱ्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले. बुधवारी पडेगाव भागात तरुणाने साडी घेऊन खोलीचा दरवाजा बंद करताच भावाला संशय आल्याने त्याने 112 या क्रमांकावर संपर्क साधला. अंमलदारांनी धाव घेत दरवाजा तोडून गळफास घेतलेल्या तरुणाला साडी कापून रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत श्वासोच्छ्वास सुरू असल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

पडेगावातील वीसवर्षीय तरुण वैयक्तिक कारणांमुळे तणावाखाली गेला होता. सायंकाळी भावासमोरच तो गळफास घेण्यासाठी साडी सोबत घेत खोलीत गेला. त्यामुळे भावाला संशय आल्याने त्याने तत्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधून “माझ्या भावाने खोलीचा दरवाजा बंद केला आहे. त्यामुळे लवकर या,’ अशी विनंती केली. छावणी पोलिस ठाण्याच्या 112 च्या गाडीवरील अंमलदार व्ही.बी. पंडित व एन.एस तांबे यांना नियंत्रण कक्षाकडून कॉल प्राप्त होताच त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

तेव्हा त्याने गळफास घेतलेला होता. पोलिसांनी त्याला वर करून तत्काळ कात्रीने फास घेतलेली साडी कापली. त्यानंतर छातीवर वारंवार दबाव टाकत त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत घाटी रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी रात्रीपर्यंत तो शुद्धीवर आलेला नव्हता. मात्र, उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. छावणीचे निरीक्षक शरद इंगळे, विशेष पथकाचे उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांनी दोन्ही अंमलदारांचे कौतुक केले.

जटवाड्यातही वाचवले होते विष प्राशन केलेल्या तरुणाचे प्राण
3 सप्टेंबर रोजी दौलताबाद पोलिस ठाण्याच्या 112 वरील दोन अंमलदारांना असाच तरुणाने विष प्यायल्याचा काॅल प्राप्त झाला होता. वीस मिनिटांमध्ये दौलताबादहून जटवाडा गाठत त्यांनी त्याला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केल्याने तरुणाचे प्राण वाचले होते.

बातम्या आणखी आहेत...