आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाच्या तक्रारी:पतीच्या आत्महत्येनंतर छळल्याचा ठपका ठेवत पत्नीवर तब्बल आठ महिन्यांनंतर गुन्हा दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात आठ महिन्यांनंतर त्याच्या पत्नीवर पतीला छळून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या केलेल्या विनोद कचरू ससाणे यांचा विवाह त्यांच्या मामाचीच मुलगी विशाखा ऊर्फ राणी हिच्यासोबत झाला होता. मात्र, सुरुवातीला त्यांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे केले व नंतर विशाखाच्या सतत कॉलवर बोलण्यावर आक्षेप घेतल्याने विशाखाने पतीलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षड्यंत्र रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

केटरिंगचा कौटुंबिक व्यवसाय असलेले विनोद (२७) आधी उस्मानपुरा परिसरात राहत होते. गंगापूर येथील त्यांचे मामा गोरख साबळे यांची मुलगी विशाखासोबत त्यांचा २०१९ मध्ये विवाह झाला. तेव्हापासून ते एकत्रच राहत होते. मात्र, लग्नाच्या पाच महिन्यांमध्येच त्यांच्यात वाद सुरू झाले. सतत माहेरी जाण्याचा हट्ट करून विशाखाने वाद वाढवले. माझ्यासोबत जोगेश्वरीला राहायला येणार असाल तरच मी सोबत राहीन, अशी अट घातली. त्यामुळे विनोद मनाविरोधात जाऊन पत्नीसह जोगेश्वरी येथे स्थायिक झाले. त्यानंतर २०२० मध्ये मुलगी झाल्यानंतर काही महिने त्यांचा संसार सुरळीत चालल्याचे त्यांचे भाऊ संतोष यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सतत मोबाइलवर बाेलत असे : संतोष यांनी आरोप करताना पुढे म्हटले की, विनोद मॉलमध्ये कामाला होते. सायंकाळी घरी परतल्यावरही विशाखा त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देत नव्हती. सतत कॉल एंगेज राहायचा. त्यामुळे विनोद यांनी कॉलबद्दल विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. कॉलबद्दल विचारणा केली असता कौटुंबिक हिंसाचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे विनोद तणावाखाली गेला होता. त्यातून त्यांनी २३ मार्च रोजी लाइव्ह व्हिडिओ करून राहत्या घरात आत्महत्या केली.

पोलिसांनी आठ महिने आम्हाला केवळ लटकवले भावाने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहिल्याचे सांगण्यात आले. परंतु त्याच्या अक्षरात मोठी तफावत आहे. आम्ही त्याच्या आत्महत्येच्या काही दिवसांतच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल करून तपास करण्याची मागणी केली. परंतु माझ्यासकट माझ्या कुटुंबाला पोलिसांनी केवळ चकरा मारायला लावल्या. मी मुंबईपर्यंत गेलो. आझाद मैदानावर उपोषणाला बसलो. त्यानंतर सात महिन्यांनी पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला, असे संतोष म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...