आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तब्बल आठ महिन्यांनंतर भाविकांना आपल्या श्रद्धास्थानी माथा टेकवण्याची मुभा उद्या सोमवारपासून मिळणार आहे. साडेतीन पीठांपैकी पूर्ण पीठ असलेली तुळजापूरची आई तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता, औंढ्याचे नागनाथ, परळीचे वैद्यानाथ आणि वेरूळचे घृष्णेश्वर आदी प्रमुख मंदिरांसह मराठवाड्यातील सर्वच मंदिरे भाविकांसाठी खुली होत आहेत.
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिर सोमवारी उघडले जाणार असून दीपावली निमित्त पहाटे चार वाजता नागनाथांना अभ्यंगस्नान व अभिषेक केला जाणार आहे. सामाजिक अंतरासाठी पाच फूट अंतरावर भाविकांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी, व्यवस्थापक वैजनाथ पवार यांनी सांगितले की, १७ मार्चपासून मंदिर बंद करण्यात आले होते. संस्थानचे आठ महिन्यांत सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसानही झाले आहे.
तुळजाभवानी मंदिरात प्रवेश पास बंधनकारक :
कुलस्वामिनी तुळजाभवानी माता मंदिराची रविवारी स्वच्छता व सॅनिटायझेशन करण्यात आले. मंदिरात दररोज केवळ ४ हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी प्रवेश पास बंधनकारक असेल. मास्क, फिजिकल डिस्टन्स अनिवार्य असेल. प्रत्येक भाविकांची ऑक्सिजन आणि तापमान तपासणी केली जाणार आहे. ६५ वर्षांपुढील वयोवृद्ध, गरोदर महिला, १० वर्षांच्या आतील बालके आणि गंभीर आजारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांना पहाटे पाच ते रात्री ९ पर्यंत प्रवेश दिला जाईल.
नागनाथ मंदिराचे निर्जंतुकीकरण
नागनाथ मंदिरात नियमितपणे साफसफाई सुरु असली तर रविवारी मंदिरांच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. दोन भाविकांमध्ये पाच फुटांचे अंतर रहावे यासाठी मार्किंग करण्यात आले आहे. मंदिराच्या गर्भगृहात पाच भाविकांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे दर्शन झाल्यानंतर इतर पाच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार आहे. दर्शन रांगेतील भाविकांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन आणण्यात आल्या आहेत. तूर्तास मंदिरातील अभिषेक बंद करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले, आ. संतोष बांगर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीनंतरच अभिषेक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.