आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:जिल्हा परिषदेची गोंधळात तहकूब झालेली सभा पाच महिन्यानंतर शांततेत, शिक्षण सभापती पदी रत्नमाला चव्हाण तर बाजीराव जुमडे यांच्याकडे कृषी सभापती पद

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हा परिषद मध्ये पाच महिन्यापूर्वी खातेवाटपावरुन गोंधळामुळे तहकूब झालेली सभा शुक्रवारी (ता. ३) शांततेत पार पडली. दोन्ही सभापतींना बिनविरोध खाते वाटप करण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून सभेची  रंगीत तालीम घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी सभा शांततेत पार पडल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला.

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर (ता. ३) फेब्रुवारी रोजी सभापतींच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण व काँग्रेसचे बाजीराव जुमडे यांच्यामध्ये शिक्षण सभापती पदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. दोघांनीही शिक्षण सभापती पदावर दावा सांगितल्यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांनी सदरील सभा तहकुब केल्याचे जाहीर केले.

दरम्यान सदर सभा आज आयोजित करण्यात आली होती. कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सामाजिक अंतर राखता यावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. तसेच बैठकीला उपस्थित राहिलेल्या सर्व सदस्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. दुपारी एक वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. यावेळी उपाध्यक्ष मनीष आखरे, समाज कल्याण सभापती फकीरा मुंडे, महिला व बालकल्याण सभापती रूपाली पाटील गोरेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी . नितीन दाताळ, गणेश वाघ यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते

सदर सभा सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे बाजीराव जुमडे यांच्याकडून कृषी व पशुसंवर्धन सभापती पदाची मागणी करण्यात आली. त्यामुळे त्यांना कृषी व पशुसंवर्धन खाते देण्यात आले तर  राष्ट्रवादीचा रत्नमाला चव्हाण यांना शिक्षण व अर्थ  खात्याचे सभापती पद देण्यात आले. दोन्ही निवडी बिनविरोध पार पडल्या. या निवडीनंतर सदस्यांनी बाजीराव जुमडे व रत्नमाला चव्हाण यांचे अभिनंदन केले.

दरम्यान मागील तीन दिवसांपासून या बैठकीची जिल्हा परिषदेमध्ये रंगीत तालीम सुरू होती. बैठकीत गोंधळ होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. मात्र पाच महिन्यापूर्वी गोंधळात तहकूब झालेली सभा पाच महिन्यानंतर शांततेत व सभापतींची बिनविरोध निवड पार पडल्यानंतर अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

रोपटयांनी वाढवली शोभा

या सभेमध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी सदस्यांच्या बाजूची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. या खुर्चीवर रोपटे  ठेवण्यात आले त्यामुळे समाजीक अंतरही राखण्यात आले आणि सभेची शोभाही वाढली.

0