आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथिक महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांतील, मानसिक आरोग्य विभागांतर्गत सरळसेवेने तांत्रिक, अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील विविध पदे परीक्षेद्वारे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली.
खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्यासमोर नुकतीच याचिकेची सुनावणी झाली होती. खा. इम्तियाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहिरातीत दिलेल्या विविध संवर्गातील पदांच्या भरतीत सुमारे ८ ते १० हजार जणांना महाराष्ट्रातील विविध शासकीय रुग्णालयात नोकरी मिळणार आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी, शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर करावेत.
१० ते २५ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरा : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात गट-क या संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी ‘राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा - २०२३’चे आयोजन केले आहे. परीक्षेसाठी १० मे ते २५ मे या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया व इतर सविस्तर तपशील संचालनालयाच्या www.med-edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
गाेरगरीब रुग्णांचे हाल
राज्यातील कोरोना साथीसंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. वेळोवेळी झालेल्या सुनावणीत त्यांनी आरोग्य विभागातील वैद्यकीय रिक्त पदांमुळे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचे कसे हाल होतात, हे निदर्शनास आणून दिले होते. राज्यातील रिक्त पदांची माहिती न्यायालयात सादर केली होती. खंडपीठने शासनाला रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम सादर करून आरोग्य विभागात विविध संवर्गांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे अंतिम आदेश दिले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.