आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘आई-पप्पा मी तुम्हाला विसरू शकत नाही. तुम्ही मनातून उतरवले आहे. मी ज्याच्यासाठी सोडले, त्याच्या कुटुंबानेही स्वीकारले नाही. मला कुटुंब असून राहिले नाही. मी रडूदेखील शकत नाही...’ असे पत्र लिहून पूजा आकाश खेडकर या २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपवले. कुटुंबाचा विरोध पत्करून एकोणाविसाव्या वर्षी या तरुणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. मात्र, तिच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. प्रेमविवाह करूनदेखील तणावाखाली गेलेल्या तरुणीने मात्र तीन वर्षांनंतर पत्र सोडून आत्महत्या केली.
पूजाचे आईवडील जाफराबादला शेती करतात. तिचे आकाशसोबत प्रेमसंबंध होते. आकाश बॅनर, पोस्टर लावायचे काम करतो. अल्पवयीन असतानाच पूजा आकाशसोबत पळून गेली होती, त्या वेळी पोलिसांनी समजूत घालून तिला परत आणले. मात्र ती कुटुंबीयांकडे परत गेली नव्हती. पोलिसांच्या निवारागृहात सुमारे दहा महिने राहिली. सज्ञान झाल्यानंतर तीन वर्षांपूर्वी तिने आकाशसोबत लग्न केले. हे दोघे विष्णुनगरमध्ये भाड्याने राहत होते. सोमवारी आकाश बाहेर गेला होता. पहाटे तीन वाजता तो घरी परतला असता पूजाने दार उघडले नाही. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद येत नसल्याने त्याने घाबरून जवाहरनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. दरवाजा तोडून पाहिले तर पूजाने गळफास घेतलेला दिसला. तिला घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन पार पडले. तेव्हा तिचा मामा रुग्णालयात आला होता.
पूजा म्हणते, ‘पोलिस बनायचे होते, पण तुमचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही’
पूजाने आईवडील, पतीला उद्देशून आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली. लग्न झाल्यापासून तिचा आईवडिलांसोबत संपर्क झाला नाही. चिठ्ठीत ती म्हणते, ‘मी एकटी झाले. मी त्याच्यासाठी कुटुंब सोडले. पण त्याच्या कुटुंबानेदेखील मला तितके स्वीकारले नाही. आई-पप्पा मी तुम्हाला विसरू शकत नाही. तुम्ही मनातून उतरवले आहे. मी ज्याच्यासाठी सोडले, तेथूनदेखील अपेक्षा अपूर्ण राहिल्या. मी आता रडू शकत नाही. मी तुम्हाला खूप त्रास दिला. मला माफ करा. पुढच्या जन्मी माझ्यासारखी मुलगी जन्माला येऊ नये. माझ्या जाण्याने त्याचे काही जाणार नाही. त्याचे कुटुंब जवळ आहे. मी कायम तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमचा नंबर कायम बंद राहिला. आता तुमचा आवाजदेखील ऐकू येत नाही. मला कुटुंब असून कुटुंब नाही. मी तुमच्या विश्वासाला तडा दिला. मला पोलिस बनायचे होते. तुमचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. कळत नकळत दुखावले असेल तर तुम्ही (पतीला) मला माफ करा.’ मला माहितीये, तुम्ही अंत्यसंस्काराला येणार नाही. माझ्या पतीने अग्नी द्यावा.’
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.