आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी चमू:कोश्यारींनंतर भाजप प्रवक्त्याकडूनही शिवरायांचा अवमान; महाराष्ट्र संतप्त

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत संतापजनक व उद्वेगजनक वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनीही पाच वेळा औरंगजेबाकडे माफी मागितली होती,’ असे वक्तव्य त्रिवेदी यांनी शनिवारी सायंकाळी एका वृत्तवाहिनीवर केले. त्यामुळे शिवभक्तांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात निदर्शने व आंदोलने केली. पुणे आणि सोलापुरात कोश्यारींचे धोतर फाडणारास लाखांचे बक्षीस जाहीर केले गेले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपालांनी शरद पवार आणि नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करून रोष ओढवून घेतला. त्यातच शनिवारी सायंकाळी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराजांनीही पाच वेळा औरंगजेबाकडे माफी मागितली होती,’ असे वक्तव्य करून शिवरायांचा अवमान केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे राज्यपाल कुणाला मान्य आहे का, असा सवाल मनीषा कायंदे यांनी केला. कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. पुण्यात राज्यपालांचा फोटो असलेले बॅनर जाळण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत, पण ते आमच्यासाठी देवापेक्षा कमी नक्कीच नाहीत. ते आमची अस्मिता आहेत. त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल माफी मागावी. भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे खा. अमोल कोल्हे म्हणाले. तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आता हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, असे आमदार रोहित पवार म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावकरांचे नातू रणजित सावरकर यांनीही त्रिवेदींच्या वक्तव्याचा निषेध केला.

असे म्हणणारा ठार वेडा : आ. जितेंद्र आव्हाड शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली, असे म्हणणारा ठार वेडाच असू शकतो, अशा शब्दांत माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्यावर टीका केली. ह्याच्या बापाने इतिहास शिकवला नाही का, असेही आव्हाड म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...