आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्राइम पेट्रोल’ पाहून प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा:​​​​​​​भीतीपोटी पहिला वार प्रियकराला लागला; पुरावेही केले नष्ट

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी सारिका व सागर. - Divya Marathi
आरोपी सारिका व सागर.

पतीच्या छळाला कंटाळलेल्या सारिका विजय पाटणी (३२) हिने पती विजय पाटणी (३५) यांची सोलापूर-धुळे महामार्गावर क्रूर हत्या केली. यात तिचा प्रियकर सागर मधुकर सावळे (२५) याची प्रमुख भूमिका असल्याचे समोर आले. सारिकाने विजय यांना नियंत्रणाबाहेर दारू पाजून वाल्मी परिसरात नेले तेव्हा तेथे सागर उपस्थित होता. या वेळी सागरने विजय यांचे दोन्ही हात धरले. परंतु, भीतीपोटी पहिला वार सागरच्या हातात खोलवर गेला. परिणामी तो जखमी झाला. त्यानंतर विजय यांचा खून करून त्यांनी एका डॉक्टरकडे कंपनीत मशीनमध्ये हात गेल्याचे सांगून उपचार घेतले. विशेष म्हणजे, हा सगळा कट “क्राइम पेट्रोल’ मालिका पाहून आखल्याचे सारिकाच्या चौकशीत समोर आले.

विजय एन-११ मध्ये वास्तव्यास होते. त्यांचा २०१० मध्ये सारिकासाेबत विवाह झाला. मात्र, काही महिन्यांपासून सारिका मुलीला घेऊन त्यांच्यापासून विभक्त झाली होती. कुवेतला जात असल्याचे सांगून ती वाळूजमध्ये राहत होती. यादरम्यान, तिची फेसबुकवर सागरसोबत मैत्री झाली. ती शहरात असल्याचे कळताच विजय यांनी भेटण्यासाठी हट्ट सुरू केला. परंतु, ते तिला असह्य झाले. त्यामुळे सागरसोबत मिळून त्यांनी विजय यांचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. दिवसभर पैठणला दारू पाजून सायंकाळी सारिका विजय यांना घेऊन सोलापूर-धुळे महामार्गावरील निर्जन स्थळी गेली. तेथे सागर दुचाकीवरून चाकू घेऊन गेला व विजय यांची हत्या केली. सुरुवातीला सागर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गेल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करत होता.

दाेघांनाही आठ दिवसांची पाेलिस काेठडी

याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे स्वत: तपास करीत आहेत. सोमवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ८ दिवस पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर चौकशीत त्यांचा विजय यांच्या हत्येचा कट नियोजित असल्याचे समोर आले. ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक पुरावे गोळा करत असून घटनाक्रम जुळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

रात्रीतून विजय यांच्या दुचाकीने शिर्डी गाठले अन् बसने परतले

विजय यांना बेपत्ता दाखवून त्या दोघांनी नामानिराळे राहायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी खासगी वाहिनीवरील “क्राइम पेट्रोल’ ही मालिका पाहून कट रचला होता. विजय यांचा खून झाल्यानंतर ते आधी विजय यांची दुचाकी घेऊन वाळूजला गेले. तेथे कंपनीत जखमी झाल्याचे सांगून सागरसाठी कपडे घेतले. रक्ताळलेले कपडे काढून फेकून देत विजय यांची दुचाकी शिर्डीला नेऊन उभी केली. त्यानंतर बसने पुन्हा शहरात परतले. तेथून पुन्हा सोलापूर-धुळे महामार्गावर जाऊन सागरची दुचाकी घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी विजय यांच्या आईकडे, तर तिसऱ्या दिवशी बेपत्ताची तक्रार दिली. मात्र, गुन्हे शाखा व सातारा पोलिसांच्या तपासात त्यांचा सर्व कट आता उघडकीस आला आहे.

बातम्या आणखी आहेत...