आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व प्रस्ताव निघणार निकाली:पीएफ आयुक्त जगदीश तांबे यांच्या हमीनंतर ‘संत एकनाथ’च्या कामगारांचे उपाेषण मागे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत एकनाथ सहकारी साखर कारखाना संचालित सचिन घायाळ शुगर कारखान्यातील २०० कामगारांनी सोमवारी पीएफ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्याची पीएफ आयुक्त जगदीश तांबे यांनी दखल घेत सेवानिवृत्त ७०० कामगारांचे पेन्शन प्रस्ताव मंगळवारपासून निकाली काढणे, खात्यावरील सर्व जमा रक्कम अदा करणे, दोन महिन्यांत ८ कोटी थकीत पीएफ दंड व्याजासह वसूल करून देण्याची हमी दिली. त्यानंतर कामगारांनी उपाेषण मागे घेतले.

कारखाना प्रशासनाने कामगारांच्या वेतनातून दरमहा पीएफ कपात केला. मात्र, २०१३-१४ पासून ते २०१९ पर्यंत पाच वर्षे आणि त्यानंतर २०२० ते २०२२ मधील ३३ महिन्यांचा पीएफ भरला नसून वेतन दिले नाही. आता हे सर्व कामगार सेवानिवृत्त झाले असून श्रमाचा मोबदला मिळावा, यासाठी संघर्ष करीत आहेत. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल दिला आहे. तरीदेखील संचालक तुषार शिसोदे, सचिन घायाळ यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही, अशी माहिती प्रकाश पवार, ज्ञानदेव मगर यांनी दिली.

‘साखर अर्थ संचालक समिती’ गठित; आज बैठक सचिन घायाळ प्रा. लिमिटेडने ९ वर्षापासून करार तत्त्वावर कारखाना चालवण्यासाठी घेतला आहे. मात्र, त्यांनी कराराची अंमलबजावणी केली नसल्याने संचालक, कर्मचारी, कामगारांनी तक्रारी केल्या. याबाबत दिव्य मराठीने १७ सप्टेंबरला वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची मुख्यमंत्री शिंदे, सहकारमंत्री सावे यांनी दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार सराकारने “साखर अर्थ संचालक समिती’ गठित केली. याबाबत समितीचे अध्यक्ष यशवंत गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पुणे येथील साखर संचालक कार्यालय येथे बैठक आयोजित केली आहे.

सेवानिवृत्त कामगार हैराण कष्टाचा मोबदला वेळेत मिळत नसल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह, मुलांचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न समोर उभा असल्याचे कारभारी कासोदे, दादासाहेब लांभाडे, रमेश काळे, रंगनाथ सोनटक्के, दगडू काळे, गणपत शिंदे, राम धारकर, विश्वनाथ शिंदे, बाळचंद्र बोंबले, भाऊसाहेब बोंबले, भानुदास भुमरे यांनी म्हटले.

संचालक आक्रमक कारखान्याचे संचालक तथा माजी आमदार संजय वाघचौरे, ज्ञानेश आवटे, आसाराम शिंदे, अहिल्याबाई झारखड यांनी उपाेषणस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा केली. यास तुषार शिसोदे, घायाळ जबाबदार असून त्यांनी संगमत करून कामगार व कारखान्याची वाट लावल्याचा आरोप केला.

बातम्या आणखी आहेत...