आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछावणी पोस्ट विभागात कार्यरत असणारे प्रवीण झोंड व त्यांच्या पत्नी विद्या यांना कन्यारत्न झाले. कन्यारत्न झाल्याचा आनंद म्हणून तसेच राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून पोस्ट विभागात कार्यरत असणाऱ्या प्रवीण झोंड यांनी सिल्लोड तालुक्यातील त्यांचे मूळगाव असणाऱ्या गोळेगावमध्ये सुमारे 30 मुलींचे पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धीचे खाते स्वखर्चाने उघडून दिले.
'मुलगी झाली - समृद्धी आली' असे म्हणत औरंगाबाद मधील झोंड – पवार परिवाराने मुलीच्या जन्माचे फुलांच्या, रांगोळीच्या पायघड्या टाकत फुलांचा वर्षाव करीत जंगी स्वागत केले. समाजातील मुलगा व मुलगी असा भेदभाव आपण नाहीसा केला पाहिजे. वंशाला दिवा पाहिजे असा विचार न करता, दोन्ही घरात प्रकाश देणार्या मुलीच्या जन्माचे सर्वांनी आनंदाने स्वागत करावे, असे मत झोंड – पवार परिवाराने व्यक्त केले.
एकीकडे समाजात आजही अनेक ठिकाणी स्री भ्रुणहत्येच्या घटना घडत असून अनेक ठिकाणी मुलींचे जन्म झाल्यानंतर नवजात अर्भकसुद्धा अज्ञात ठिकाणी टाकुन देण्याचा घटना घडत असताना दुसरीकडे अशाप्रकारे सकारात्मक आणि आदर्श पावलेही उचलली जाऊन आदर्श निर्माण केला जात आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच रेखा विष्णू धनवट या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक अशोक धनवडे यांच्यासह, गणेश बनकर, जावेद देशमुख, केशवराव झोंड, निवृत्ती तोडकर, स्वप्नील पवार, वैजीनाथ सावंत, भाऊसाहेब झोंड, मुक्ताराम गव्हाणे, भगवान झोंड, सलमान बागवान, काशिनाथ इंगळे आदी उपस्थित होते.
मुलींच्या जन्माचे आनंदाने स्वागत करावे
आपण मुलगा असो किंवा मुलगी असा कोणताच भेदभाव न करता दोन्हींच्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात केले पाहिजे. आमच्या कुटुंबात मुलगी जन्माला आल्यानंतर आम्ही तिचे मनापासून स्वागत केले. मुलीच्या रूपाने आमच्या घरी जिजाऊ, सावित्री, अहिल्याई, रमाई आणि फातिमाबी यांचा समर्थ वारसा सांगणारी वारसदार जन्मल्याचा आनंद आहे. आम्ही खुप आनंदी आहोत. असे विद्या प्रवीण झोंड यांनी अभिमानाने सांगितले.
योजनेचा लाभ घ्यावा
मुलीच्या जन्मानिमित्त गावातील मुलींचे पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धीचे खाते उघडून देऊन झोंड परिवाराने सर्वांसमोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. पोस्ट ऑफिस मधील सुकन्या समृद्धी योजनेमुळे गावातील मुलींचे भविष्य उज्ज्वल होऊन भविष्यामद्धे मुलींचे शिक्षण तसेच लग्नासाठी मुली आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्यास नक्कीच मदत होईल. सुकन्या समृद्धीसह पोस्ट ऑफिस मधील इतरही बचत योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा.
- अशोक धनवडे, प्रवर डाक अशीक्षक, औरंगाबाद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.