आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भित्यापोटी ब्रम्हराक्षस:नांदेडमध्ये कोरोनानंतर आता 'या' आजाराच्या तपासणीला पुढे कोणी येईनात

शरद काटकर / नांदेड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सद्यस्थितीत कोरोनाच्या भिंतीमुळे थुंकीचे नमुने देण्यास कोणी पुढे येत नसल्याचे चित्र

नांदेड जिल्ह्यात एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र, अजूनही नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कायम असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक क्षय रोगाच्या तपासणीला समोर येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तपासणी मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही एक ते १६ डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग रूग्ण शोध व क्षयरोग रूग्ण शोध मोहीम हाती घेतली. या मोहिमे अंतर्गत आरोग्य विभागाने १८१० पथकांची स्थापना केली. एका पथकात दोन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत आशा सेविकांचा समावेश आहे. प्रत्येक दिवशी २० घरांचे सर्वेक्षण करण्यात येतं.

यात दोन आठवड्यापेक्षा जास्त राहिलेला खोकला, वजनात घट, भूक मंदावणे, हलकासा ताप, गळ्याला गाठ, असे लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या थुंकीचे नमुने (स्वॅब) घेतले जातात. पुढे संशयित रुग्णास एक्सरे काढण्यासाठी रुग्णालयात बोलवले जाते. त्यानंतर वजनानुसार त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात येतात. परंतु, सद्यःस्थितीत कोरोनाच्या भीतीमुळे थुंकीचे नमुने देण्यास कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही मोहीम आता ३१ डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

११८ क्षय रुग्ण आढळले

आरोग्य विभागाच्या १ ते १६ डिसेंबर च्या अहवालानुसार २४ लाख ८८ हजार ८४ लोकसंख्येपैकी २३ लाख ६२ हजार ५१५ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात पाच हजार ६३० जण संशयित आढळले. यातील संशयित चार हजार ७४२ जणांचे थुंकीचे नमुने घेण्यात आले. यात ११८ जणांचे स्वॅब क्षय पाॅझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी (ता१९) आणखी पाच रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाचे किमान दोन टक्के रूग्ण आढळतील असे उद्दिष्ट होते. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे तपासणीला कोणी पुढे येत नसल्याने एक टक्का उद्दीष्ट झाले आहे.,असे जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी कोरोनाची भिती मनातून काढून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले.

जनजागृतीची गरज

नागरिकांमधील कोरोनाची भीती घालविण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. यासाठी ग्रामीण भागात विविध माध्यमांचा वापर करतात येईल. तेव्हांचा क्षयाच्या तपासणीसाठी नागरिक पुढे येतील.

बातम्या आणखी आहेत...