आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडित कुटुंबाला 24 तास सुरक्षा:शेतकऱ्याच्या खुनानंतर घाटीत नातेवाइकांचा 6 तास ठिय्या

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेत नसल्याने पिसादेवी येथील शेतकरी जनार्दन कोंडिबा कसारे (५६, रा. पिसादेवी) यांची १८ आॅगस्ट राेजी सहा जणांनी डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली. आराेपींना अटक करण्याच्या मागणीसाठी कुटुंब, नातेवाइकांसह समाजाच्या प्रतिनिधींनी घाटीच्या शवविच्छेदनगृहाबाहेर सहा तास ठिय्या आंदोलन केले. घोषणाबाजी केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.महसूलच्या अधिकाऱ्यांनी पारदर्शक तपासासह कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी दोन वाजता कुटुंबाने जनार्दन यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस बंदोबस्तात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. शिवाय त्यांच्या कुटुंबाला २४ तास पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे.

पिसादेवीच्या साईनगरात कसारे दोन मुले, सुना व पत्नीसह राहत होते. त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले असून त्या परिसरातच राहतात. कसारे पिसादेवीतील आठ एकर गायरान जमीन कसत हाेते. बाजूची एक एकर शेती आरोपी शिवाजी औताडे यांच्या ताब्यात होती. मात्र, उर्वरित आठही एकरवर शिवाजीसह बाळू औताडे, गिरिजा औताडे, भरत औताडे, महादू औताडे, बबन औताडे यांनी दावा ठोकला. १५ वर्षांपासून हा वाद होता. २००८ मध्ये हे प्रकरण ठाण्यात गेले. त्यात औताडे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. सप्टेंबरमध्ये त्याची सुनावणी होती. १८ ऑगस्टला शिवाजी औताडे व इतर आरोपी कसारे यांच्या शेतात गेले. तू गुन्हा मागे का घेत नाही, असे म्हणत त्यांना मारहाण करत थेट डोक्यात कुऱ्हाड घातली. त्यात कसारे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर समाजातून तीव्र संताप व्यक्त झाला. रात्री ठाण्याबाहेर जमाव जमला हाेता. शुक्रवारी मात्र तो अधिक संतप्त झाला. घाटीच्या शवागृहाबाहेर मुलगी, पत्नी टाहो फोडत होत्या. सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत तणाव होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर, चिलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त अशोक थोरात आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात
उपजिल्हाधिकारी रोडगे यांनी कुटुंबाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांकडे अॅट्रॉसिटी प्रकरणातला निधी मिळण्यासाठी पाठपुरावा, तहसीलदार पवार यांच्याकडे गायरान जमिनीचा स्वतंत्र तपास करण्याचे आदेश, आरोपींवर कडक कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला व कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेतला.

चाैघांना चार दिवस काेठडी
या गुन्ह्यात आतापर्यंत शिवाजीसह गिरिजा बाळू औताडे, भरत महादू औताडे, महादू गंगाराम औताडे यांना अटक करण्यात आली आहे. बबन व बाळू या दोन मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. न्यायालयाने इतर चौघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यापुढे गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाकेबंदी व पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्याचे उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...