आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसतीच औपचारिकता:मनपाच्या पहिल्याच आढावा बैठकीनंतर पालकमंत्री भुमरेंकडून ‘बघू, करू’ची उत्तरे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शुक्रवारी (७ ऑक्टोबर) प्रथमच मनपातील कामांच्या आढाव्याची बैठक घेतली. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात दीड तास ही बैठक चालली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुमरेंनी कुठल्याही विषयावर ठोस उत्तर दिले नाही. पत्रकारांनी आठ प्रश्न विचारले. त्यापैकी चारच प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. तीही ‘बघू, करू, निधी आणू, मुख्यमंत्र्यांशी बोलू’ याच प्रकारची होती. इतर चार प्रश्नांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पालकमंत्र्यांची बाजू सावरली.

दुपारी एक वाजेची बैठकीची वेळ होती, पण दीड तास उशिराने बैठक सुरू झाली. आधी भुमरे यांनी स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल रूमची पाहणी केली. शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क कसे आहे हे समजून घेतले.

गारखेडा येथील चौकातील पॉइंट त्यांना दाखवण्यात आले. तेव्हा या ठिकाणी असलेल्या मैदानाचे गेट सीसीटीव्ही निगराणीखाली आणा, अशी सूचना त्यांनी केली. या वेळी आमदार प्रदीप जैस्वाल, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजयसिंह यांची उपस्थिती होती.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरात विविध कामे सुरू आहेत. या कामांचा आढावा पुढील आठवड्यात गुरुवारी घेतला जाईल, असे भुमरे यांनी सांगितले. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा आढावा, सफारी पार्कचा आढावा व इतर बाबींविषयी आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...