आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी:राज्यातील सत्तांतरानंतर आज होणार मराठवाड्यामध्ये ग्रा.पं.चा रणसंग्राम

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर घडल्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून रविवारी प्रत्यक्ष मतदान होत आहे. आता यात बाळासाहेबांची शिवसेना-भाजप की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकालाअंती गावचे कारभारी ठरणार आहेत. कुणाच्या पारड्यात किती मते पडली याचाही आकडा समोर येणार आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन यामध्ये सर्वच पक्षांनी समर्थकांना बळ दिले आहे, यामुळे मतदार नेमके कुणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जालना : जवखेडा खुर्दची बिनविरोधची प्रथा मोडीत जिल्ह्यातील बदनापूर तालुका वगळता जालना, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील २५४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव असलेली जवखेडा खुर्द ही ग्रामपंचायत ३० वर्षांपासून बिनविरोध होण्याची प्रथा होती. यंदा ही प्रथा मोडीत निघाली.

औरंगाबाद : फुलंब्रीमध्ये तीन सरपंच बिनविरोध औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, खुलताबाद, कन्नड, गंगापूर, सोयगाव, वैजापूर, फुलंब्री व औरंगाबाद या तालुक्यांतील २१९ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यात फुलंब्री तालुक्यातील तीन सरपंचांसह २१ सदस्य बिनविरोध आहेत. त्यामुळे उर्वरित २११ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सरपंचपदासाठी ४६३, तर सदस्यपदासाठी २९७८ उमेदवार रिंगणात आहेत.

परभणी : जिल्ह्यातील ७ ग्रामपंचायती बिनविरोध जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यात परभणी तालुक्यातील २९, गंगाखेडमधील १२, जिंतूर ३३, मानवतमधील ७, पालममधील ११, पाथरी मध्ये ७, पूर्णा तालुक्यातील १३, सेलूमधील ११ व सोनपेठ तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. यातील केवळ ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. १ हजार ९० जण सदस्यपदासाठी मतदान आहे.

हिंगोली : वारंगाफाटा, मसोडमध्ये दुरंगी लढत हिंगोली जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होणार आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील १६, सेनगाव तालुक्यातील १०, कळमनुरी तालुक्यातील १६ औंढा तालुक्यातील ७, तर वसमत तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा, मसोड, कांडली या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमधून दुरंगी लढत होणार आहे.

उस्मानाबाद : राणांच्या गावात तिरंगी लढत, उत्सुकता शिगेला उस्मानाबाद जिल्ह्यात १६६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून यातील सहा ग्रामपंचायती प्रतिष्ठेच्या आहेत. उस्मानाबाद तालुक्यात

या टप्प्यात ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्या तरी तेर गावात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या तेर गावात तिरंगी लढत होत आहे. यात कोण बाजी मारते याकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी निकाल जाहीर होईल.

बीड : राजुरी, दैठण गावात आमदारांची प्रतिष्ठा पणाला बीड जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार असलेले त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात राजुरी ग्रामपंचायतीसाठी लढत होत आहे. तर, पंडितांची राजधानी समजल्या जाणाऱ्या गेवराई तालुक्यातील दैठण गावात माजी मंत्री बदामराव पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे. यात कोण बाजी मारते याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...